
शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्रांची निर्मिती
अलिबाग, ता. २४ (बातमीदार) ः शालेय स्तरापासून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण, तसेच पाणी व आरोग्य विभागाने प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्र उभारले जाणार आहे. जिल्हा परिषदेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच शाळांमध्ये विविध सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे न वाटता शिकण्यासाठी स्वयंप्रेरित करणे हा यामागील उद्देश आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वच्छता माहिती केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, माध्यमिक शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्याबरोबरच शाळांमध्ये आरोग्यदायी, स्वच्छतास्नेही वातावरण निर्मिती, पर्यावरणपूरक स्वच्छता सुविधांची निर्मिती व वापर करणे, स्वच्छतागृहे, शौचालयांच्या नियमित वापरास प्राधान्य देणे, ओला, सुका कचरा वर्गीकरण व शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे यांची रचना स्पष्ट करणे, नागरिक व शालेय स्वच्छता आरोग्य समिती यांच्या साह्याने स्वच्छता जन चळवळ उभी करणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शाळांनी राबविण्याचे उपक्रम
दहा विद्यार्थी, एक शिक्षक यांना स्वच्छता प्रशिक्षण, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांगस्नेही स्वच्छतागृह निर्मिती.
इन्सीनेटर मशीन बसविणे.
हॅडवॉश स्टेशन, परसबाग, स्वच्छतागृहात नळ कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा.
परसबागा, शोषखड्ड्यांची निर्मिती.
प्लास्टिक संकलन केंद्र व कचराकुंड्यांची व्यवस्था.
किशोरवयीन मुलींना मासिक पाळीदरम्यान विश्रांतीसाठी रेस्टरूम, सॅनिटरी पॅड, वाचनीय पुस्तकांची उपलब्धता.
भिंतीवर सचित्र स्वच्छता संदेश
सॅनिटेशन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा देणे.
वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्कची निर्मिती.
कार्यशाळांद्वारे उपक्रमांची जनजागृती
प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छ्ता केंद्रांची निर्मिती या उपक्रमाची माहिती देण्याकरिता गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याकरिता पाणी व स्वच्छता विभागामार्फत नुकतेच कार्यशाळेचे आयोजन केले होते. महिला बचतगट, शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र काम केल्यास सामाजिक क्रांती घडेल. या तीन घटकांमार्फत प्रत्येक घरापर्यंत पोहचणे सहज शक्य असून, स्वच्छतेची चळवळ निर्माण होईल, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मांडले. यावेळी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, सागरमित्र संस्थेचे विनोद बोधणकर, युनिसेफ प्रतिनिधी जयंत देशपांडे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36772 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..