
ग... गटारीचा अन् बेत मांसाहार पार्टीचा
हेमंत देशमुख, कर्जत
ग... गटारीचा! नुसतं नाव उच्चारले तरी खवय्यांना त्यांच्या डोळ्यांसमोर चमचमीत मांसाहार आणि मद्याचा महापूर दिसू लागतो. खरे तर गटारी अमावस्याला धार्मिक महत्त्व आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने गटारी अमावस्येला विशेष करून मांसाहार करणारे खवय्ये पार्ट्यांचे बेत आखतात. अगदी घराघरांत मटण-मच्छीचे वास दूरपर्यंत दरवळत असतात.
यंदा गटारी अमावस्या गुरुवारी येत असल्याने अनेकांनी शेवटचा शनिवार, रविवार म्हणून जेवणाची पार्टी ठेवली आहे. अनेकांनी तर फार्म हाऊसकडे आपला मोर्चा वळवला आहे.
यंदा गुरुवारी गटारी अमावस्या आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, त्यावरही मात्रा म्हणून शनिवार, रविवार वीकेंड साधत अनेकांनी अगोदरच गटारी करण्याचे ठरवले आहे. यासाठी कर्जतच्या फार्महाऊसकडे मुंबई, पुण्याच्या गाड्या धावू लागल्या आहेत. तालुक्यात दोन हजारांपेक्षा अधिक फार्म हाऊसेस आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक मुंबई आदी मोठ्या शहरातील धनिकांचे आहेत. यामध्ये अगदी उद्योगपतीपासून ते सिने कलाकार, राजकीय नेते मंडळी आहेत. त्यामुळे अनेक जण पावसाळ्यात बहरलेल्या निसर्गरम्य वातावरणात गटारी तथा पार्टी करण्यासाठी दरवर्षी फार्महाऊसला येतात. पावसाचा आनंद घेत चमचमीत स्वादिष्ट मांसाहार जेवणाचा आनंद घेत आहेत. काही मत्स्यप्रेमी तर नदीवरील माशांवर ताव मारत गटारी साजरी करण्याचा बेत आखत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक मित्र मंडळी गटारी कुठे व कशी दणक्यात साजरी करायची याचे बेत आखले जाऊ लागले आहेत. कोणाचे फार्महाऊस पार्टीसाठी मिळतो का? यासाठी मित्रांना गळ घातली जात आहे. मित्रही फार्महाऊसच्या शोधात विचारणा करताना दिसत आहेत.
---------------------
फार्महाऊस हे निसर्गाच्या सानिध्यात ग्रामीण भागात असल्याने पार्टी करणारे मटण-मच्छी, मद्य, थंडपेय; तसेच चकण्यासाठी लागणारे अन्य जिन्नस खरेदी करण्यासाठी जवळच्या बाजारपेठा गाठतात. त्यामुळे येथील व्यासायिकांना या गटारीनिमित्ताने का होईना चांगला धंदा होऊन चार पैसे अधिक मिळत आहेत.
- दिनेश हरपुडे ,चायनीज सेंटर आणि बियर शॉप मालक ,कशेळे
-------------------------
गेल्या वर्षभरात वाढलेले पेट्रोल-डिझेलचे भाव, परराज्यातून बकरी/बोकड खरेदी करायला येणाऱ्या व्यावसायिकांचे आक्रमण वाढले आहे. बकऱ्यांचा तुटवडा असल्याने खरेदी बाजारमध्ये वाढलेले भाव आणि बाजारामध्ये वाढलेली मटणाची मागणी पाहता मटणाची भाववाढ होणे स्वाभाविकच आहे. तरीही वर्षानुवर्ष ग्राहकाचे असलेले कौटुंबिक संबंध पाहता भाववाढ अत्यंत अल्प प्रमाणात होईल.
- सुजित धनगर, सरचिटणीस, अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना
---------------------------
दर (रुपयांत)
बोकडाचे मटण ६५०
चिकन २४०
---------------------------
नदीतील माशांनाही पसंती
पावसामुळे नदीतील मासे बाजारात उपलब्ध आहेत. त्यावरही खवय्यांच्या उड्या पडत आहेत. यामध्ये मळे, शिवडा, खवली, दंडवनी, शिंगटे, वाम, फंटूस, डाकू आदी माशांचा समावेश आहे.
----------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36780 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..