शिक्षकांचे वेतन एका क्लिकवर खात्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांचे वेतन एका क्लिकवर खात्यात
शिक्षकांचे वेतन एका क्लिकवर खात्यात

शिक्षकांचे वेतन एका क्लिकवर खात्यात

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : महिनाभर शाळेत विद्यार्थ्यांना शिकवूनही शिक्षकांच्या खात्यामध्ये वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे महिन्याचा ताळमेळ ठेवणे जिकिरीचे झाले होते. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अर्थ विभाग यांच्या समन्वयामुळे आता जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात एका क्लिकवर जमा होणार आहे. झेडपीएफएमएस या प्रणालीमुळे शिक्षकांच्या थेट खात्यात हे वेतन जमा केले जाणार आहे. त्याची प्रक्रिया जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या तीन हजारांपेक्षा अधिक शाळा असून, या शाळांमध्ये सहा हजार चारपेक्षा अधिक शिक्षक आहेत. तर ९१ केंद्रप्रमुख आहेत. त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच निवडणूक व अन्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना घरोघरी पोहचवण्याचे काम शिक्षक, केंद्रप्रमुख करतात. या शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. वेतनाचा निधी कोषागार कार्यालयाकडून जिल्हा परिषद वित्त विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे वर्ग होतो. त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडे धनादेश पाठवला जातो. गटविकास अधिकारी तो धनादेश त्यांच्या सहीने बॅंकामध्ये पाठवतात. त्यानंतर बॅंका प्रत्येक शिक्षकांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा करतात. या प्रक्रियेमुळे शिक्षक, केंद्रप्रमुख यांना वेतन मिळण्यास दहा ते पंधरा दिवसांचा विलंब होतो. याचा परिणामी शिक्षकांना महिन्याचा आर्थिक मेळ जुळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे शिक्षक, केंद्रप्रमुखांना वेतन मिळण्यास विलंब होण्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्याबाबत अनेक वेळा शिक्षकांकडून निवेदनही देण्यात आले. याचे गांभीर्य ओळखून शिक्षण आयुक्त यांच्या सुचनेनुसार शिक्षकांना वेळेवर वेतन मिळावे, यासाठी आधुनिक पद्धत सुरू करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार वित्त विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने जिल्ह्यामध्ये झेडपीएफएमएस ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली यशस्वी
झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे मुख्य लेखा, वित्त अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील ९१ केंद्रप्रमुखांच्या खात्यात प्रायोगिक तत्त्वावर वेतन जमा करण्याची सुरुवात मे महिन्यात करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सहा हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या खात्यात आता थेट एका क्लिकवर वेतन जमा होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कामाची जबाबदारी
रायगड जिल्हा परिषद अर्थ विभागाच्या संजीवनी घरत एफएमएस प्रणालीच्या राज्य समन्वयक म्हणून, तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अमित पंड्या हे शालार्थ समन्वय म्हणून काम पाहत आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अर्थ विभागाच्या या पुढाकारामुळे शिक्षकांना एका क्लिकवर वेतन ठरलेल्या वेळेला मिळण्याची सोय झाली आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून वितरित झालेल्या वेतनाचा निधी आता मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांच्या खात्यामध्ये थेट जमा केला जात आहे.

शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होत असल्यामुळे झेडपीएफएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यात वित्त विभागामार्फत वेतन जमा होत आहे. शिक्षकांना वेऴेवर वेतन मिळण्याची ही प्रणाली चांगली आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36826 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..