
शाळा, अंगणवाड्यांना मुबलक पाणी
प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाऊस पाणी संकलन उपक्रम राबवत झिंक टाकी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ७४ ठिकाणी, तर ९५ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी झालेली नाही. या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत श्रीवर्धन, पेण, खालापूर, रोहा या तालुक्यांतील शाळा, अंगणवाड्यांमध्ये ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यामधील तीन हजार १९६ शाळांपैकी तीन हजार १२२ शाळांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७४ शाळांमध्ये नळजोडणीचे काम शिल्लक आहे. तसेच जिल्ह्यात एकूण तीन हजार ९३ अंगणवाड्या असून, दोन हजार ९९८ मध्ये नळजोडणीचे काम करण्यात आले आहे. उर्वरित ९५ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीचे काम शिल्लक आहे. जिल्ह्यात दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा पोहचत नसल्याने पाऊस पाणी संकलन उपक्रम राबवण्यात येत आहे. श्रीवर्धन, पेण, खालापूर, रोहा, तळा तालुक्यांतील ९५ अंगणवाड्या आणि ७४ शाळांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंगणवाड्या, शाळांच्या आवारात पाण्याची टाकी उभारून पावसाचे पाणी त्यात साठवले जाणार आहे. टंचाईच्या काळात या टाकीद्वारे शाळांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रोहा, पेण, खालापूर व श्रीवर्धन तालुक्यांतील शाळा, अंगणवाड्यांमधील ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे डोंगर, दुर्गम भागातील शाळांना मुबलक पाणीपुरवठा मिळणार असून, पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे.
-----------------
दृष्टिक्षेप
शाळा अंगणवाडी
एकूण ३,१९६ ३,१९६
नळजोडणी ३,१२२ ३,१२२
पाऊस पाणी संकलन ७४ ९५
पाऊस पाणी संकलन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी उभारली जाणार आहे. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36846 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..