खड्ड्यांमुळे एसटी सेवा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांमुळे एसटी सेवा बंद
खड्ड्यांमुळे एसटी सेवा बंद

खड्ड्यांमुळे एसटी सेवा बंद

sakal_logo
By

अलिबाग, ता. १ (बातमीदार) ः अलिबाग-रोहा मार्गावरील बोरघर फाटा ते रामराज या दोन किमी अंतरावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे एसटी महामंडळाच्या एसटी बसमध्ये बिघाड होत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे एसटी महामंडळाने बोरघर फाटा ते रामराज मार्गावरील एसटी बस सेवा बंद केली आहे. या बंद सेवेचा प्रवाशांसह विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे.
अलिबाग तालुक्यातील बोरघर फाटा ते रामराज हा रस्ता रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मार्गावरील रामराज हे मुख्य स्थानक असून रामराजला मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. शनिवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. भाजीपाल्‍यासह, किराणा सामान, ओली- सुकी मासळी व अन्य खाद्य पदार्थ, वस्तू, कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. यातून स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळतो.
रोहा तालुक्यातील सानेगाव, दापोली अलिबाग तालुक्यातील कुदे, सुडकोली, नांगरवाडी, ताजपूर, नवघर, उमटे, बेलोशी, महाजने, वावे, मल्याण, चिंचोटी, दिवीपारंगी, फणसापूर, बापळे भोनंग आदी गावांतील हजारो नागरिक रामराजमध्ये खरेदीसाठी येतात. रामराज हे वर्दळीचे ठिकाण असल्याने बोरघरफाटा ते रामराज या मार्गावरून दुचाकी वाहनांसह तीन चाकी, चारचाकी वाहने व एसटी बसची ये-जा असते. रामराज हे मुख्य ठिकाण असल्याने एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे.
अलिबाग व रोहा एसटी बस आगारातून अलिबाग-रामराज-रोहा, अलिबाग-रामराज, रोहा रामराजमार्गे अलिबाग अशा अनेक बस या मार्गावरून सुरू केल्या आहेत. अलिबाग-रोहा मार्गावरून रामराजकडे जाण्यासाठी बोरघर फाट्यावरून दोन किलोमीटर जावे लागते. अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. त्यामुळे बोरघरफाटा ते रामराज मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरूप निर्माण होते. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बोरघर फाटा ते रामराज रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा खासगी वाहनचालकांसह सरकारी एसटी महामंडळालादेखील बसत आहे. खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा एसटी सेवा बंद केली जाईल, असा इशारा एसटी महामंडळाने दिला होता; परंतु त्‍याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने अनेक दिवसांपासून बोरघर फाटा ते रामराज मार्गावरील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. एसटी बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यात विद्यार्थ्यांसह अलिबाग, रोह्याकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो.

रामराज ते बोरघरफाटा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे टायर फुटणे, स्प्रींग खराब होणे असे अनेक प्रकार घडले आहेत. या मार्गावरून एसटीची वाहतूक करणे धोकादायक आहे. खड्डे भरून घेण्याबाबत, अन्यथा एसटी सेवा बंद केली जाईल, असे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समिती बांधकाम विभागाला दिले होते. तरीही या यंत्रणांकडून दखल घेतली नाही. त्यामुळे आठ दिवसांपासून बोरघर फाटा ते रामराजपर्यंतची एसटी सेवा बंद केली आहे.
- अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग

एसटी महामंडळाच्या पत्राची दखल घेत अलिबाग पंचायत समिती उपअभियंता यांना अलिबाग-रोहा मार्गावरील बोरघर फाटा ते रामराज रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची दखल तातडीने घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय होणार नाही. याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
- के. वाय. बारदेस्कर,
कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36923 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top