मच्छीमारांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छीमारांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
मच्छीमारांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

मच्छीमारांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३ (बातमीदार) ः पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीमार्फत खाडीमध्ये गरम पाण्यासह सांडपाणी सोडले जात आहे. तसेच जेएसडब्लू व पीएनपी कंपनीच्या जहाजांमुळे मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जहाजांमुळे मच्छीमारांच्या जाळींचे नुकसान होण्याबरोबरच गरम पाण्यामुळे खाडीतील मासळी नष्ट होत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा फटका मच्छीमारांना बसला आहे. याप्रकरणी नुकसानभरपाई मिळावी म्हणून मच्छीमारांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे मच्छीमारांचे म्‍हणणे आहे.
तालुक्यातील धेरंड, शहापूर, धाकटे शहापूर, घसवण, बहिरीचा पाडा, मानकुळे, काचळी, पिटकीरी, हाशिवरे, कावाडे, देहेन, दुर्गदर्या या गावांमधील असंख्य आगरी-कोळी समाजबांधवांचे आजही उदरनिर्वाहाचे साधन मासेमारीच आहे. या व्यवसायावर १५ हजारांपेक्षा अधिक मच्छीमार अवलंबून आहेत. पेण तालुक्यातील डोलवी या ठिकाणी जेएसडब्लू कंपनी, तर शहाबाज परिसरात पीएनपी कंपनी आहे. कंपनीत येणारा कार्गो जलवाहतुकीद्वारे आणला जातो. जेएसडब्लू कंपनीच्या सांडपाण्यामुळे समुद्रातील मासे नष्‍ट होत आहेत, तर बोटींमुळे जाळींचे नुकसान होत असल्याचे मच्छीमारांचे म्‍हणणे आहे. आतापर्यंत सुमारे साडेसहा कोटींचे नुकसान झाल्‍याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
धेरंड येथील बहिरेश्वर मत्‍स्‍य व्यवसाय विकास मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष धर्मा सखाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंपनी प्रशासनाला वारंवार पत्र देऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी दालनात याबाबत बैठकाही घेण्यात आल्या आहेत. तत्कालीन मत्स्य विकास मंत्री यांच्या समवेतही बैठक झाली आहे. भरपाई देण्याबाबत प्रशासन व सरकारकडूनही सांगण्यात आले आहे. मात्र जेएसडब्लू व पीएनपी कंपनीच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्‍याने मच्छीमार आक्रमक झाले आहेत. लवकरच याप्रकरणी आंदोलन करण्यात येणार असून त्याला जबाबदार सरकार व प्रशासन राहील, असा इशारा धर्मा पाटील यांनी दिला आहे.

पीएनपी व जेएसडब्लू कंपनीच्या बोटींमुळे जाळ्यांचे नुकसान झाले आहे. जेएसडब्लू कंपनीच्या सांडपाण्याबरोबरच गरम पाण्यामुळे धरमतर खाडीतील मासळी नष्ट होत आहे. गेली बारा वर्षे भरपाईसाठी लढा देत आहोत. तरीही मच्छीमारांचे प्रश्न कंपनी प्रशासनाकडून सुटलेले नाहीत.
- धर्मा सखाराम पाटील, अध्यक्ष
बहिरेश्वर मत्स्य विकास मच्छीमार संस्था, धेरंड

खाडीमध्ये मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यांचे कंपनीच्या बोटींमुळे नुकसान झाले आहे. भरपाई मिळावी यासाठी अनेक वेळा दाद मागितली. तरीही कंपनी प्रशासन लक्ष देत नाही.
- रवींद्र पाटील, मच्छीमार

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36957 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..