
वॉटरफॉल रॅपलिंगचा रोमांचकारी थरार
अमित गवळे, पाली
पावसाळ्यात प्रामुख्याने धबधबे, धरणे, गडकिल्ले व निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी गर्दी होते. मात्र, याबरोबरच जिल्ह्यात वॉटरफॉल रॅपलिंग या अॅडव्हेंचर खेळाचा रोमांचकारी, रोमहर्षक थरार व मौज अनुभवण्यासाठी लोक पसंती देताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई व पुणे येथील तरुण व तरुणींचा सहभाग व उत्साह अधिक पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील भिरा येथील देवकुंड, पनवेलजवळील दोधानी धबधबा, अलिबाग तालुक्यातील सागरगड येथील धबधबा, कर्जत तालुक्यातील डिकसळ व भिवपुरी येथील बेकरे या धबधब्यांवर वॉटरफॉल रॅपलिंगसाठी गर्दी असते. विविध संस्था येथे वॉटरफॉल रॅपलिंगचे आयोजन करतात. त्यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध होत आहे. सुधागड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक व मॅकविला द जंगल यार्डचे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी सांगितले, पनवेल येथील दोधानी धबधब्यावर प्रत्येक वीकेंडला रॅपलिंगचे आयोजन सुरू करण्यात येत आहे. मागील आठवड्यात एसएनडीटी महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थिनींनी वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवला आहे.
रॅपेलिंग हा एक गिर्यारोहणाचाच प्रकार असून उत्कृष्ट साहसी खेळ आहे. कारण यात कोणीही करू शकणार्या चढाई व उतरणे या क्रियेचा समावेश आहे. यात फार कमी वेळात लोक खाली उतरू शकतात. वॉटरफॉल रॅपलिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते. शिवाय, थरार व मजाही सुरक्षितपणे अनुभवता येते. त्यामुळे दिवसेंदिवस रॅपलिंगला अधिक पसंती मिळत आहे. जिल्ह्यात यासाठी उत्कृष्ट व सुरक्षित ठिकाणेही आहेत. पुणे-मुंबई आदी शहरातील हौसी पर्यटक मोठ्या प्रमाणात रॅपलिंगचा आनंद व थरार अनुभवतात.
रोमांचकारी
चिकट झालेल्या तीव्र उताराचा धबधब्याचा कातळ, त्यावरून कोसळणारे पाणी आणि यावर दोरीच्या साह्याने धबधब्याच्या टोकावर जाणे व खाली येणे. हे सर्व अतिशय रोमांचकारी आणि संपूर्ण शरीरात तीव्र अद्भूत चेतना जागवणारे आहे.
संरक्षणाचा फायदा
रॅपलिंगचा व्यावहारिक आणि स्पर्धात्मक दोन्ही उपयोग व फायदा आहे. व्यावहारिकतेमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती (सेल्फ रेस्क्यू) किंवा इतर व्यक्तींना उंचीवरून सुरक्षितपणे खाली उतरण्याची आवश्यकता असते. त्यावेळी रॅपलिंगचा खूप फायदा होतो. तसेच स्व-स्पर्धात्मक राहणे ही माणसाला तितकेच नवीन आव्हाने देतात. अनुभवही तितकाच दांडगा होतो.
अनेक जण पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग या इव्हेंटसाठी जिल्ह्यात येत असतात. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करत आहोत. मॅकविला द जंगल यार्ड ही टीम मागील आठ वर्ष वॉटरफॉल रॅपलिंग, कॅम्पिंग-ॲडव्हेंचर, ट्रेकिंग, क्लाइंबिंग, सर्च अँड रेस्क्यू, स्कूल इव्हेंट, कॉर्पोरेट इव्हेंट अशा क्षेत्रात काम करत आहे. जिल्ह्यात यासाठी अधिक वाव व पसंती आहे.
- मॅकमोहन हुले, प्रशिक्षक व संस्थापक मॅक विला द जंगल यार्ड
नुकताच पनवेल येथील दोधानी धबधब्यावर रॅपलिंगचा अनुभव घेतला. हा माझ्या आयुष्यातील आजवरचा सर्वोत्तम अनुभव होता. आम्हाला येथील स्वयंसेवकांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. यापुढे इतरांनाही सोबत घेऊन पुन्हा रॅपलिंगसाठी यायचे आहे.
- वंशिका बोराटे, विद्यार्थिनी
मॅकविला द जंगल यार्ड वॉटरफॉल रॅपलिंग इव्हेंट हा माझ्या आयुष्यातील सर्वांत थरारक, आकर्षक, उत्साही, जबरदस्त व मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. सर्व प्रशिक्षक विशेषतः मॅकमोहन हे प्रेरणादायी आणि सहकार्य करणारे होते. त्यांनी माझ्या गटातील कोणत्याही सदस्यांना कधीही भीती वाटू दिली नाही. आमच्या गटातील सदस्यांना रॅपलिंगचा अनुभव पुन्हा घ्यायचा आहे.
- प्रतिमा तिवारी, सहल आयोजक, एसएनडीटी महाविद्यालय
पाली : धबधब्यावर रॅपलिंग करताना तरुण.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36985 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..