साथीच्या आजाराचे रुग्‍ण बळावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साथीच्या आजाराचे रुग्‍ण बळावले
साथीच्या आजाराचे रुग्‍ण बळावले

साथीच्या आजाराचे रुग्‍ण बळावले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या साथीचे आजार बळावले असून लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक नागरिक तापाने फणफणले आहेत. दोन महिन्यांत ताप, सर्दी, खोकला अशा साथरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यांत बाह्यरुग्ण तपासणीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. येणाऱ्या गौरी-गणपतीच्या सणात साथीचे रोग बळावू नयेत यासाठी आरोग्य विभाग खबरदारी घेत आहे; परंतु आरोग्य विभागाचे प्रयत्न रुग्णालयात होणाऱ्या गर्दीवरून कमी पडत असल्याचे दिसत आहेत.

सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे; परंतु साधारण दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत ऊन होते. अचानक झालेल्या तापमान बदलामुळे साथरोग झपाट्याने वाढू लागल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना, स्वाईन फ्ल्यू यांसारख्या आजाराचेही रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. यासह साप, सर्दी यांसारखे आजार येणाऱ्या गौरी-गणपतीच्या सणामध्ये बळावू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
जुलै महिन्यात सुमारे पन्नास हजार बाह्यरुग्ण तपासणीमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्ण हे साथरोगाचे आहेत. जूनच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारित असलेल्या विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बाह्यरुग्ण तपासणीमध्ये कमालीची वाढ झाली. लावणीची कामे संपल्यानंतर यात अचानक वाढ झाली होती. सुमारे ५० हजारांहून अधिक रुग्णांनी तपासणी केली असता बहुतांश रुग्ण सर्दी, खोकला, ताप, पडसे आदी साथरोगाचे आहेत. साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक व पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.

डास, गढूळ पाण्यामुळे साथ रोगाचा प्रसार
जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागांमध्ये, तसेच शहराच्या काही ठराविक भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्‍याने आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंगी, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, चिकनगुनिया अशा तापजन्य गंभीर आजारांबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळ्यात आढळून येत आहेत. मलेरियाची रुग्‍णसंख्या कमी असली तरी डासांच्या फैलावामुळे वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

आरोग्य विभागाच्या विविध उपाययोजना
कोरोनाची भीती मावळत असली तरी साथजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित देणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवणे यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनीही स्वत:ची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पेण तालुक्यात आठवडाभरापूर्वी स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण होते. आता येथील साथ आटोक्यात आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. मात्र पावसाळ्यातील साथ रोगांचे आजार बळावत आहेत. त्‍यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्‍यावे.
- डॉ. गजानन गुंजकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37053 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..