ज्‍येष्ठांनी उलघडला ७५ वर्षांचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्‍येष्ठांनी उलघडला ७५ वर्षांचा इतिहास
ज्‍येष्ठांनी उलघडला ७५ वर्षांचा इतिहास

ज्‍येष्ठांनी उलघडला ७५ वर्षांचा इतिहास

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभर विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित केले जात आहेत; मात्र सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी गावातील ज्‍येष्ठ नागरिकांची मुलाखत घेतली व तब्बल ७५ वर्षांचा कालखंड उलगडला.
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक टिळक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमडोशी, वांगणी व बाळसई या गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती त्यांच्या घरी जाऊन घेतल्या. ज्‍येष्ठांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ७५ वर्षांनंतरचे ग्रामीण जीवन व त्यामधील विविध स्थित्यंतरे जाणून घेतली.
आमडोशी गावातील रामदास गणपत जांबेकर (७८), वांगणी गावातील दगडू कृष्णा दळवी (७६), बाळसई गावातील शांताराम गणपत भोसले (७६), विठोबा धर्मा तेलंगे (८०), गोपाळ दगडू म्हसकर (७८) व त्यांच्या पत्नी राधिका गोपाळ म्हसकर (७५), वसंत शंकर भोसले (७५) या ज्‍येष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेतल्या.
मुलाखतीतून विद्यार्थ्यांनी ७५ वर्षांपूर्वीचे ग्रामीण समाजजीवन व त्यातील स्थित्यंतरे, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या गावातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती, गावातील लोककला व कलाकार, जलस्रोत, पारंपरिक उत्सव - जत्रा, मौखिक परंपरा, अर्थकारण, शेती, प्राणीजीवन, दुष्काळी परिस्थिती, महापूर, दळणवळणाची साधने, उदरनिर्वाहाची साधने, गावातील पारावरचे न्यायनिवाडे, पारंपरिक खेळ, पाऊलवाटा, शेतीची अवजारे, दुधदुभते, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष इत्यादी बाबींची सविस्तर माहिती घेतली. त्या काळी असलेल्या गावातील एकोप्याचा सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या मुलाखतीतून अभिमानाने उल्लेख केला आणि गावातील हरवत चाललेल्या माणुसकीविषयी खंत व्यक्त केली. तसेच रोजगार व नोकरीनिमित्ताने शहरात स्थलांतरित होऊन गावाशी नाळ तुटलेल्या नवीन पिढीविषयी चिंताही व्यक्त केली. त्या काळी आलेल्या दुष्काळाच्या आठवणी सांगताना काही ज्‍येष्‍ठांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतींच्या मालिकेतून कुमार वयातील १५ वर्षांच्या मुलांना ७५ वर्षांचा ग्रामीण समाजजीवनाचा इतिहास समजला आणि भविष्यात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणाही मिळाली. तसेच तीन ते चार पिढ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत झाली. ज्‍येष्ठ नागरिकही सुखावले होते.
- टिळक खाडे, शिक्षक, उपक्रमाचे निर्माते

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37127 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..