इकोफ्रेंडली मखरांना पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इकोफ्रेंडली मखरांना पसंती
इकोफ्रेंडली मखरांना पसंती

इकोफ्रेंडली मखरांना पसंती

sakal_logo
By

महेंद्र दुसार, अलिबाग
बुद्धीचे दैवत असलेल्या गणेशाचे आगमन अवघ्‍या काही दिवसांत होणार असून त्‍यासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सजावट, आरास, नैवेद्य, फराळ, पूजा साहित्‍य खरेदीसाठी बाजारांत गर्दी वाढली आहे. महागाईमुळे सर्वच वस्‍तूंच्या किमती १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्‍या आहेत. त्‍यामुळे गणेशभक्‍त जास्त वर्ष टिकू शकतील अशा पर्यावरणपूरक मखरांना पसंती देत आहेत. कागद, पुठ्ठा, कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फूल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला आरास करण्यासाठी पसंती दिली जात आहे.
प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळून इको-फ्रेंडली सजावट साहित्याला मागणी वाढल्‍याने विक्रेत्यांनीही भुसा प्लाय, लाकडी पट्ट्या, रेशीम कापड आणि त्यावर डायमंडची सजावट असलेले मखर बाजारात आणले आहेत. हे मखर व्यवस्थित ठेवल्यास वर्षानुवर्ष टिकतात, असे अलिबागमधील मखर विक्रेते रामकृष्ण पाटील यांनी सांगितले. जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ ते या व्यवसायात कार्यरत आहेत.
सणांचा पवित्र महिना असलेल्‍या श्रावणातील वातावरण धार्मिक, आध्यात्‍मिक स्‍वरूपाचे असते. त्‍यामुळे वातावरणात सकारात्‍मक ऊर्जा जाणवते. गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईची उपकरणे, कृत्रिम फुलांनी बाजारपेठा सजल्‍या आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोली, नागोठणे, पोयनाड, रेवदंडा, इंदापूर, महाड या मोठ्या बाजारपेठा म्हणून ओळखल्या जातात. महामार्गालगतही सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली असून गणेशभक्तांकडून जोरदार खरेदी केली जात आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक जण घराबाहेर असतात. मखराची झटपट जोडणी करून आकर्षक सजावट करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. यासाठी अनेक वर्षे टिकणाऱ्या मखरांना गणेशभक्‍त पसंती देत आहेत. गणेशभक्तांची आवड लक्षात घेऊन, राजस्थानी सजावटीचे मखर बाजारात येऊ लागले आहेत. याबरोबरच प्लास्‍टिक, लोकरीची फुले, सजावटीसाठी रंगीबेरंगी, मखमली, रेशमी कापडी पडद्यांनाही मागणी वाढली आहे.
- सुशांत पाटील, विक्रेता