शहिद जवानांचे पाटणूस गाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहिद जवानांचे पाटणूस गाव
शहिद जवानांचे पाटणूस गाव

शहिद जवानांचे पाटणूस गाव

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
स्‍वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात माणगाव तालुक्‍यातील पाटणूस येथील स्‍मृतिस्‍तंभाला देण्यात आलेली मानवंदनेमुळे हे गाव चर्चेत आले. या गावाचा इतिहास आजच्या पिढीला फारसा ज्ञात नाही. जगाच्या इतिहासात इ.स. १९१४ ते १९१८ दरम्यान झालेले पहिले महायुद्ध खूप प्रभावशाली ठरले. त्या वेळी ब्रिटिशांकडून लाखो भारतीयांनी युद्धात सहभागी होऊन पराक्रम दाखवला होता. रायगड जिल्ह्यातील पाटणूस या छोट्याशा गावातील काही सैनिकही युद्धात सहभागी झाले होते. त्यातील ४५ जणांना युद्धमरण आले. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटीश सरकारने गावात स्मृतिस्तंभ उभारला. हा स्मृतिस्तंभ आजही गावाची वेगळी ओळख जोपासत आहे.
पाटणूस ग्रामपंचायत व कुंडलिका विद्यालयाच्या परिसरामध्ये हा स्मृतिस्तंभ आहे. त्यावर पांढऱ्‍या संगमरवरावर इंग्रजीमध्ये स्पष्टपणे कोरून ठेवले आहे, की पाटणूस गावातील ४५ माणसे इ.स. १९१४ ते १९१९ दरम्यान पहिल्या युद्धात लढण्यास गेली होती. या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणूस गावकऱ्‍यांसह सरपंच व ग्रामपंचायतीमार्फत २६ जानेवारी व १५ ऑगस्टला स्मृतिस्तंभ सजवला जातो आणि मानवंदना दिली जाते. स्मृतिस्तंभाचा परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे; मात्र हे ४५ हुतात्मे कोण होते, याची कोणालाही माहिती नाही. सरकारदरबारीदेखील याची नोंद दिसत नाही.


पहिल्या महायुद्धात लाखोंचा नरसंहार
इ.स. १९१४ -१९१९ दरम्यान झालेले पहिले महायुद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युके/ब्रिटन व इटली आणि अमेरिकेची संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया/जर्मनी, बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य) यांच्यात झाले होते. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. यामध्ये लाखो लोकांचा नरसंहार झाला.

भारतीयांचा सहभाग
युरोपसह, आशिया, आफ्रिका, अमेरिका या खंडात तसेच प्रशांत महासागरात पहिले महायुद्ध लढले गेले. यामध्ये भारतातील दीड लाखांहून अधिक प्रशिक्षित जवान लाखो व्हॉलेंटिअर/स्वयंसेवक ब्रिटिशांच्या बाजूने सहभागी झाले होते. यामध्ये ७४ हजार १८७ भारतीय जवान शहीद झाले; तर ६७ हजारांहून अधिक भारतीय जखमी झाले होते.

पाली ः तत्‍कालीन ब्रिटिश सरकारने उभारलेला स्मृतिस्तंभ. पाटनूस ग्रामपंचतीमार्फत परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. (छायाचित्र ः अमित गवळे)