निसर्गाच्या कुशीतील श्री कनकेश्वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाच्या कुशीतील श्री कनकेश्वर
निसर्गाच्या कुशीतील श्री कनकेश्वर

निसर्गाच्या कुशीतील श्री कनकेश्वर

sakal_logo
By

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कनकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात विशेष गर्दी असते. अलिबागपासून १० किलोमीटरवर दोन हजार फूट उंचीच्या एका डोंगरावर कनकेश्वर वसलेले आहे. प्रसिद्ध असलेला कनकेश्‍वर मंदिर परिसर हवेशीर असल्याने येथे पर्यटकांसह भाविकांची बारा महिने मांदियाळी असते.

डोंगराच्या पायथ्याच्या मापगावपर्यंत उत्तम डांबरी सडक आहे. झिराड या गावावरून डोंगरातून एक वाट कनकेश्वराला जाते, तर मापगावपासून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जाता येते. मंदिर परिसरात जाताच आलेला थकवा नाहीसा होतो. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे. परंतु, येथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. वडोदरा येथील गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
मंदिर परिसर खूपच सुंदर आणि हवेशीर आहे. अलिबागमधील नागरिक या ठिकाणी वर्षातील बाराही महिने निसर्गाचा आनंद आणि देवदर्शनासाठी येत असतात. मंदिराचा सभामंडप भव्य असून अलिकडेच बांधलेला आहे. अंतराळ व गर्भगृह प्राचीन आहे. गर्भगृहात द्वारपट्टी शिल्पसमृद्धी असली तरी बरीचशी शिल्पे भंगलेली आढळतात. गर्भगृहाच्या सात ते आठ पायऱ्या उतरल्यावर आपण श्री कनकेश्वराच्या चांदीने मंडित अशा प्राचीन शिवलिंगापाशी येतो. या ठिकाणी श्रावणी सोमवारनिमित्ताने भक्तांची गर्दी झालेली असते.

आख्यायिका
आज्ञापत्र या प्रख्यात ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मन:स्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते, असे म्हटले जाते. स्थानिक आख्यायिकेनुसार पांडवांनी वनवासाच्या कालावधीत येथे सोन्याचे शिवलिंग स्थापून उपासना केली. कनक म्हणजे सोने, यामुळेच नाव पडले कनकेश्वर. आता सोन्याचे लिंग राहिले नसून सध्या ते पूर्णपणे चांदीच्या मुखवट्याखाली असते. या मंदिराची व्यवस्था श्री कनकेश्वर देवस्थान, मापगाव यांच्या वतीने केली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37256 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..