नैवेद्यात उकडीच्या मोदकाला विशेष मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैवेद्यात उकडीच्या मोदकाला विशेष मान
नैवेद्यात उकडीच्या मोदकाला विशेष मान

नैवेद्यात उकडीच्या मोदकाला विशेष मान

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. ३० ः मोदक, गणपती व कोकण यांचे समीकरण वेगळेच आहे. बाप्पाच्या प्रसादात उकडीच्या मोदकांना वेगळाच मान असतो. याच मोदकांमुळे जिल्ह्यातील अनेक महिलांना रोजगार मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. संकष्टी, अंगारक चतुर्थीबरोबरच गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांना भक्‍तांकडून मोठी मागणी असते. घरगुती खानावळी, गृहोद्योगाबरोबरच बचतगटांनीही मोदक बनविण्यास सुरुवात केल्‍याने या व्यवसायात मोठी उलाढाल होत आहे.
गणरायाच्या आवडीचे नैवेद्य असल्याने ग्रामीण व शहरी भागात मोदक आवर्जून बनवले जातात. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून उकडीच्या मोदकांचा सुगंध घराघरांत दरवळतो. या मोदकांची चवच वेगळी असते. बदलत्या राहणीमानाबरोबरच धावपळीच्या युगात उकडीचे मोदक घरोघरी तयार करणे, गृहिणींना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑर्डर देऊन मोदक बनवून घेतले जातात. यातून शहरांबरोबरच ग्रामीण भागातही रेडिमेड मोदक उपलब्‍ध होऊ लागले असून त्‍यामुळे घरगुती जेवण देणारे, खानावळी, बचत गटातील महिलांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे.
अलिबागमधील विद्या पाठारे या १२ वर्षांपासून मोदक बनविण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या सोबत तीन महिला काम करीत असून यातून त्‍यांना चांगला रोजगार उपलब्‍ध झाला आहे.
संकष्टी, अंगारकी, व गणेशोत्सवानिमित्त ५० मोदकांपासून दोनशे, अडीचशे मोदकांना ऑर्डर असते. त्यामुळे वर्षाला सुमारे अडीच-तीन हजार मोदक सहज बनवले जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. उकडीचे मोदक गणपतीच्या आवडीचे असून एक सात्त्विक आहार म्हणून पाहिले जात असल्‍याने त्याचा आस्वाद घेण्यासाठी भक्‍त नेहमीच आतुर असतात.

एक मोदक १८ ते २० रुपयांना
एक मोदक तयार करण्यासाठी सुमारे दीड मिनीट लागत असून एका तासात दोनशे मोदक तयार केले जातात. पूर्वी एक मोदक १२ ते १५ रुपयांना मिळायचा, मात्र वस्‍तूंच्या किमती वाढल्‍याने आता १८ ते २० रुपयांना मिळतो आहे. तर शहरांत एक मोदक २५ ते ३० रुपयांना मिळतो. यात साजूक तूप, बासमती तांदूळ असे असल्‍यास अतिरिक्‍त दर आकारला जातो.


उकडीचे मोदक तयार करण्याचा व्यवसाय १२ वर्षांपासून करीत आहे. अलिबाग शहरासह महाड, चौल, श्रीवर्धन, रेवदंडा येथून उकडीचे मोदकांसाठी ऑर्डर येते. या व्यवसायातून चांगला रोजगार प्राप्त होत असून एक वेगळे समाधान यातून मिळत आहे. या व्यवसायामुळे अन्य महिलांनादेखील रोजगार मिळत आहे.
- विद्या पाठारे, मोदक व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37347 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..