गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकांची जादू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकांची जादू
गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकांची जादू

गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकांची जादू

sakal_logo
By

अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ४ ः जिल्ह्यात लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. कोरोनाकाळात दोन वर्षे निर्बंध होते; मात्र यंदा निर्बंध हटल्याने गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. ताल व लयबद्ध वादनाने हे पथक सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतात.
पारंपरिक संस्कृती टिकावी आणि तरुणांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा, या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक ढोल-ताशा-ध्वज पथक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात साधारण १५ ते २० ढोलताशा पथक आहेत. सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व तालावर बहुतांश ढोल-ताशा पथकातील सदस्य सध्या सरावातून अतोनात मेहनत घेत आहेत. डीजे व डॉल्बीपेक्षा आता पारंपरिक वाद्यांकडे सगळेच जण आकर्षित होत आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये हमखास ढोल-ताशा पथक आपल्या पारंपरिक कलेचा नमुना मोठ्या प्रमाणात सादर करताना दिसतात. काही ढोल-ताशा पथक अनेक सामाजिक उपक्रमदेखिल राबवितात. गणपतीमध्ये गणेशापुढे मानवंदना दिली जाते.

गणपतीनिमित्त जवळपास दीड महिना आधीपासून सराव सुरू होतो. महाड, माणगाव या शाखेत सायंकाळी ५ ते ८ या वेळेत जंगी सराव चालतो. पथकात साधारण ८ ते ९ वयोगटापासून ४५ वर्षे वयोगटाचे सदस्य आहेत. तसेच आतापर्यंत २५० पेक्षा अधिक सदस्य प्रशिक्षित केले आहेत. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. काही पथक सदस्यांकडून शुल्क घेतात; तर काही घेत नाहीत.
- रोहन धेंडवाल, संस्‍थापक, जगदंब ढोल-ताशा पथक

नवीन ठेका व ताल
बहुतांश ढोल पथक आपला नवीन ठेका व ताल यांचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतात. यात १ ते ५ असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असेही म्हटले जाते. लोक आनंदी होऊन डोलू व नाचू लागतील, अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळते.

नियमांचे पालन
प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे असे काही नियम असतात. ते प्रत्येक सदस्यांना तंतोतंत पाळावे लागतात. त्यामध्ये व्यसनाधीनता व गैरवर्तन चालत नाही. सरावास नियमित हजर राहणे, ठरविलेला गणवेश परिधान करावा, मुलींनी मुलींचा ढोल स्वतः ताणावा (ओढावा) व त्यांनीच तो उचलावा, पालकांची परवानगी आवश्यक, रात्री उशीर झाल्यास मुलींना घरी सोडण्यास जाणे आणि सर्व सदस्यांनी शिस्तीचे व नियमांचे पालन करावे.

साहित्याची देखभाल-दुरुस्‍ती
कोणत्याही ढोल-ताशा पथकात प्रामुख्याने ढोल, ताशा, टोल, ध्वज (ध्वजावर मानाचा कळस) टोल गाडी व झांज आदी साहित्याचा समावेश असतो. वेळोवेळी या सर्व साहित्याची योग्य देखभालदेखील करावी लागते.

तरुणांसह लहान मुलेदेखील मोठ्या प्रमाणात या पारंपरिक वादनाकडे आकर्षित होत आहेत. कित्येकांना ढोल हातात मिळाला नाही तर ते बैचेन होतात. गणेशोत्सव काळात ढोल-ताशा पथकांना खूप मागणी आहे. यासाठी कित्येक दिवस सरावदेखील केला आहे.
- उमेश तांबट, वीर गर्जना ढोल-ताशा पथक, पाली

सहा वर्षांपासून ढोल-ताशा पथकात वादक आहे. पारंपरिक वादनाबरोबरच येथून शिस्तबद्धतादेखील अंगी बाणवते. नियमित सराव करतो.
- अनिकेत महाडिक, वादक, गोरेगाव, जिल्हा रायगड

पाली ः लय आणि तालबद्ध वादन करताना ढोल-ताशा पथक. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37382 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..