वातावरण बदलामुळे भातशेतीला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वातावरण बदलामुळे भातशेतीला धोका
वातावरण बदलामुळे भातशेतीला धोका

वातावरण बदलामुळे भातशेतीला धोका

sakal_logo
By

अलिबाग, ता. ४ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. वातावरणात बदल झाल्याने तापमान वाढत आहे. वातावरणाचा परिणाम जिल्ह्यातील भात पिकांवर होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात पिवळा खोडकिडा, सुरळीत आळी, निळे भुंगिऱ्याच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मात्र जिल्ह्यातील कृषी विभागाने हा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यामध्ये सुमारे ९५ हजार हेक्टरमध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून कधी ऊन कधी, कधी रिमझीम पाऊस तर कधी ढगाळ वातावरण सुरु झाले आहे.या बदलत्या वातावरणाचा भात पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील खालापूरसह काही तालुक्यातील भागात खोड किडा, भुंगिरे या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा कृषी विभागाने गाव भेटी घेऊन जनजागृती सुरु केली असून तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करून औषध फवारणीचे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कृषी सहायकांच्या मदतीने क्रॉप सॅप या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्यक्षात शेतांवर जाऊन पिकांवरील किड रोग व त्यावरील सर्वेक्षणाचे काम केले जात आहे.
सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते. सुरळीतील अळीचा प्रादूर्भाव आढळून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर किडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. सुरळ्या पाण्यात पडतील नंतर शेतातील पाणी एका बाजूने बाहेर काढावे. पाणथळ भागांमध्ये बांध बांधून घेऊन दाणेदार कीटक नाशकांचा वापर करावा.

भात पिकावर खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून खोडकिडीची अळी प्रथम कोवळ्या पानावर उपजीविका करते. खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. लावणी नंतर शेतात ५ टक्के किडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळून आल्यास उपाययोजना कराव्यात. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये २० ते २५ मीटर अंतरावर एक असे आठ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.

खाचरातील पाण्याचा निचरा आवश्‍यक
निळ्या भुंगेराचा प्रादूर्भाव भात खाचरा मधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सखल भागांची शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पाहणी करावी. फुटव्यांच्या अवस्थेत एक भुंगेरा किंवा एक ते दोन प्रादुर्भावीत पाने प्रति चूड आढळून आल्यास या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजावे. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता भात खाचरात पाणी जास्त काळ न साठवता निचरा होईल याची काळजी घ्यावी. भात लावणीनंतर बांध तनवीरहित ठेवावेत.

पाने करपल्‍याने वाढ खुंटते
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे भात पिकावर विशेषत: सुवर्णा भात जातीवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगामुळे सुरुवातीला पानांवर ठिपके दिसून येतात. पिकाच्या वाढीसोबत ठिपक्यांचे आकारमान वाढवून पानांवर असंख्य ठिपके निर्माण होऊन पाने करपून रोपांची वाढ खुंटते. लष्करी अळी व तपकरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी देखील योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

बदलत्या हवामानामुळे किडरोगाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी कृषी सहायकांच्या मदतीने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37394 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..