रंगीबिरंगी फुलपाखरांचा रायगडात डेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगीबिरंगी फुलपाखरांचा रायगडात डेरा
रंगीबिरंगी फुलपाखरांचा रायगडात डेरा

रंगीबिरंगी फुलपाखरांचा रायगडात डेरा

sakal_logo
By

अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ११ ः देशात १ ते ३० सप्टेंबरदरम्यान तिसरा फुलपाखरू महोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातही फुलपाखरांच्या तब्बल १४७ प्रजाती असून पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडे व निसर्ग संपदेमुळे पोषक वातावरण, २४० किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, कांदळवने व अभयारण्य अशा प्रतिकूल वातावरणामुळे रंगीबेरंगी फुलपाखरांचे जणू नंदनवन फुलले आहे.
देशात फुलपाखरांच्या साधारण १५०० प्रजाती असून महाराष्ट्रात त्यापैकी ३४५ प्रजाती आढळतात. त्यातील तब्बल १४७ प्रजाती एकट्या रायगड जिल्ह्यात आढळून येतात. यात प्रामुख्याने ग्रेट एगफ्लाय, रथिंडा आमोर, युप्लॉईया कोर, कॉमन मॉरमॉन, कॉमन लियोपार्ड, कॉमन पियरोट अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश आहे. फुलपाखरांच्या प्रजननासाठी फूड प्लांट येथे आढळतात. त्यामध्ये कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोकाची झाडे जिल्ह्यात असल्याने फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळून येत आहेत. तसेच पोषक वातावरणामुळे भविष्यात जिल्ह्यात फुलपाखरांचे उद्यान होण्यासारखी परिस्थिती असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
-------------------------------------
तणनाशकांचा अतिवापर घातक
पावसाळ्याच्या सुमारास असंख्य फुलपाखरे आढळतात. यावेळी मादी झाडांच्या पानांवर अंडी घालते. मात्र जिल्ह्यात तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे फुलपाखरांच्या अळ्यांना खाद्य मिळत नाही. तसेच त्यांचा मृत्यूदेखील होतो. यामुळे तणनाशकांच्या वापरावर मर्यादा येण्याची गरज आहे.
--------------------------------------------
औद्योगिकीकरणामुळे अधिवास नष्ट
पुणे-मुंबई शहरांच्या वेशीवर असल्याने जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात सुरू आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत असल्याने फुलपाखरांना खाद्य मिळत नाही. त्यांचा अधिवास नष्ट होतो. तसेच प्रजननदेखील होत नाही. शिवाय कारखान्यांमधील प्रदूषणाचाही फुलपाखरांच्या जीवनक्रमावर प्रतिकूल परिणाम होतो.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
पोषक वातावरणामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. फुलपाखरांसाठी जिल्ह्यात सुरक्षित पर्यावरण आहे. त्यांच्या विविध अवस्थांच्या निरीक्षणासाठी अभ्यासक उत्सुक असतात.
- शंतनू कुवेस्कर, फुलपाखरू अभ्यासक, माणगाव
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
काही दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील पाटणूसजवळ माळरानावर एका छोट्या झाडावर कॅबेज व्हाईट या जातीची असंख्य फुलपाखरे अंडी देताना जमलेली दिसली. जिल्ह्यात फुलपाखरांसाठी पोषक पर्यावरण आहे. जिल्ह्यातील फुलपाखरांचे संवर्धन झाले पाहिजे. तसेच या फुलपाखरांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.
- राम मुंढे, पक्षी अभ्यासक, विळे-माणगाव
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
पश्चिम घाटाचा बहुसंख्य भाग आणि प्रतिकूल निसर्गामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. कांदळवनातही फुलपाखरे आढळतात. या फुलपाखरांच्या अधिवासाचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, अलिबाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37470 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..