रेशन दुकानांना कार्पोरेट लूक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेशन दुकानांना कार्पोरेट लूक!
रेशन दुकानांना कार्पोरेट लूक!

रेशन दुकानांना कार्पोरेट लूक!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १५ : रायगड जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना आता कॉर्पोरेट लूक येणार असून आयएसओ मानांकन देण्याची योजना जिल्हा पुरवठा विभागाकडून राबवण्यात येणार आहे. यामुळे दुकानातील अस्वच्छता, नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, रेशनधारकांना दिली जाणारी वाईट वागणूक, धान्य मोजताना होणारी हातचलाखी कमी होईल, असा विश्वास पुरवठा विभागाला आहे.
रेशनधारकांना चांगली सुविधा मिळाव्यात यासाठी पुरवठा विभाग प्रयत्‍नशील असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील १० दुकानांचा या योजनेत समावेश केला आहे. रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, आकर्षक मांडणी, वेळेवर धान्य वितरण, कोणत्या योजनेंतर्गत किती धान्य प्राप्त झाले, याची माहिती फलकावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यापुढे रेशन दुकानचालक चक्क गणवेशात असतील आणि धान्य वाटप करताना अल्पउत्पन्न गटातील ग्राहकांशी सौजन्याने वागताना दिसतील.
ग्राहकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रेशन दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेशन दुकानचालकांनी तयारीही सुरू केली आहे. यासंदर्भातील आढावा जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.

योजनेचा उद्‌देश्‍य
रेशन दुकानदारांनी स्वयंप्रेरणेतून ग्राहकांना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या अनुषंगाने आवश्यक सुधारणा व्हाव्यात, या उद्देशाने अन्नधान्य पुरवठा विभागाने संबंधित संस्थेमार्फत रेशन दुकानांना आयएसओ मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांची तपासणी करून दुकानचालकांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे.


काय बदल होणार
* चालू महिन्यात किती धान्य उपलब्ध झाले, याची माहिती फलकावर असेल.
* सीसी टीव्ही, प्रथमोपचार पेटी, अग्‍निशमन यंत्र, पिण्याचे आरओ पाण्याची सुविधा
* निकृष्ट धान्य ग्राहकांना वाटप न करता गोदामातून बदलून देणार.
* दुकानदाराचा मोबाईल क्रमांक, परवान्याची प्रत दर्शनी भागावर असेल.
* चढ-उतार करताना धान्याची नासाडी रोखणार
* दुकानदारासह कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड

धान्य वितरण पारदर्शक होणार
वजन-काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावले जाईल, त्याबाबत शंका असल्यास कोठे तक्रार करायची, याबाबतचे क्रमांक, पत्त्याचाही बोर्ड दुकानाबाहेर लावला जाईल. दुकानदार, तसेच दुकानाबाबत काही तक्रारी असल्यास त्याबाबतही कोठे तक्रार करावी, याची माहिती देणारे बोर्ड लावणे बंधनकारक राहणार आहे. दुकानातील उपलब्ध धान्याची आवक-जावक, उपलब्ध साठा याचीही माहिती या बोर्डवर लिहिण्यात येणार आहे.

मापातील हातचलाखी रोखण्यासाठी दुकानदारांना अद्ययावत वजनकाटे दिले जात आहेत. त्याचबरोबर जास्त उत्पन्न गटातील ४ हजार ५०० ग्राहकांची यादी तयार केली असून त्यांना रास्त धान्य वितरण व्यवस्थेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. गरजवंताना धान्य वितरणाची सुविधा देताना रेशन दुकानांचा लूक बदलण्याचा प्रयत्न आहे. आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची माहिती दुकानदारांना दिली जात आहे.
-मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37540 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..