बालविवाह विरोधी कायदा अधिक सक्षम हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाह विरोधी कायदा अधिक सक्षम हवा
बालविवाह विरोधी कायदा अधिक सक्षम हवा

बालविवाह विरोधी कायदा अधिक सक्षम हवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : कोरोना काळात ग्रामीण भागात बालविवाहांचे प्रमाण वाढले. परंतु या बालविवाहांची माहिती शासकीय यंत्रणांपर्यंत पोहचत नसल्याने बालविवाहांचा खरा आकडा समोर येत नाही, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्‍त केली. बालविवाह विरोधी कायदा अधिक सक्षम करण्‍याची गरजेचे आहे. जर गावात बालविवाह झाला तर सरपंच, सदस्‍य तसेच पोलिस पाटील यांच्‍यावर कारवाई करणारा कायदा करावा, अशी शिफारस आयोगाने राज्‍य सरकारकडे केल्‍याची माहिती चाकणकर यांनी दिली.
अलिबाग येथे चाकणकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत राज्‍य महिला आयोगाची जनसुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांनी राजस्व सभागृहात राष्ट्रीय पोषण महा पोषण पंचायत चर्चासत्रात विविध योजनांचा आढावा घेतला. बालविवाहामुळे कुपोषण, महिला आणि बालमृत्‍यूंचे प्रमाण वाढते. म्‍हणूनच लोकप्रतिनिधी आणि स्‍थानिक सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. रायगड जिल्‍ह्यात वर्षभरात ७ बालविवाह रोखण्‍यात आले आहेत. राज्यात महिलांवरील बलात्‍कार, हुंडाबळी अशा अत्‍याचारांचे प्रमाण कोकणात सर्वात कमी असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

महिलांसाठी वन स्टॉप सेंटर
राज्‍यातील सर्व जिल्हा मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी वन स्‍टॉप सेंटर सुरू करण्‍यात येतील जेणेकरून पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. तसेच प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी समुपदेशन केंद्र असणार आहे. रायगड जिल्‍हा पोलिसांनी त्‍यासाठी मंजुरी मिळवली आहे. त्‍यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्‍या घटनांमध्ये कुटुंबात समझोता घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करण्याच्या सूचना त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना केल्या.

६७ तक्रारी दाखल
जनसुनावणीत एकूण ६७ तक्रारी दाखल झाल्‍या. त्‍यावर ४ पथके तयार करून सुनावणी घेण्‍यात आली. यात प्रामुख्‍याने कौटुंबिक हिंसाचाराच्‍या ४६ तक्रारी होत्‍या. उर्वरित २१ तक्रारी या अन्‍य प्रकारच्‍या होत्‍या. कौटुंबिक हिंसाचाराच्‍या घटना मोठया प्रमाणात घडतात. त्‍यासाठी पोलिसांच्‍या माध्‍यमातून भरोसा सेल समुपदेशनाचे काम करून या कुटुंबामध्‍ये समझोता घडवून आणण्यास मदत होणार आहे.

१५ सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई
गर्भलिंग चाचणी विरोधी कायद्यानुसार १५ सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्‍यात आली. त्‍यापैकी ६ केंद्रधारकांना शिक्षा झालेली आहे. अन्‍य प्रकरणे न्‍यायालयात प्रलंबित असल्‍याची माहिती चाकणकर यांनी दिली. कुपोषणावर मात करणार रूपाली चाकणकर यांनी पोषण माह अंतर्गत बैठक घेतली आणि जिल्‍ह्यातील महिला व बालकांच्‍या कुपोषणाच्‍या सद्यःस्थितीचा आढावा घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37553 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..