पर्यटन, ट्रेकिंग जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन, ट्रेकिंग जोरात
पर्यटन, ट्रेकिंग जोरात

पर्यटन, ट्रेकिंग जोरात

sakal_logo
By

अमित गवळे, पाली

गेल्या महिन्यात काही प्रमाणात पावसाने दडी मारल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र आठवडाभरापासून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पावसाळी पर्यटन बहरले आहे. शिवाय ट्रेकिंगलाही अनेकांची पसंती मिळत असून स्थानिक व्यावसायिकांना उभारी मिळाली आहे.
जिल्ह्यातील ठिकठिकाणी पांढरे शुभ्र धबधबे व धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले आहे. कुंडलिका, अंबा, उल्हास, सावित्री, पाताळगंगा व गाढी आदी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. डोंगरावरून खळखळत वाहणाऱ्या जलधारांना जोर आला असून हे वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे. सुधागड, सरसगड, रायगड, मानगड, अवचितगड, मृगगड आदी गडकिल्ले व डोंगरांवर ट्रेकिंगसाठी येणाऱ्‍‌यांची संख्या वाढली आहे. सुटीच्या दिवशी तसेच वीकेण्डला माणगाव तालुक्यातील भिरा-पाटणूस गावाजवळील देवकुंड तसेच ताम्हिणी घाटात पर्यटक व ट्रेकर्सनी गर्दी केली होती. पावसाचा जोर वाढल्‍याने आणखी काही दिवस पर्यटनासाठी सुगीचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सह्याद्रीच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाळी पर्यटनाचा आनंद मिळत असल्याने पर्यटकांना जणू पर्वणीच आहे. येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणातून होणाऱ्‍‌या विसर्गात चिंब भिजण्याचा व मनसोक्त डुंबण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. शिवाय धुक्याचे वातावरण पर्यटकांना धुंद करते. याबरोबरच काही यू-ट्युबर्स व ब्लॉगरदेखील येथील निसर्गसौंदर्य जगासमोर आणत आहेत.
नाशिक येथील भावना फुलझेले यांनी १३ सप्टेंबरला भरपावसात देवकुंड ट्रेक केला. त्यांच्यासोबत आणखी ३० महिला होत्या. मुसळधार पाऊस, वाहते पाणी, उंचावरून कोसळणारा देवकुंड धबधबा, १६ किमी पायी चालणे, आल्हाददायक निसर्ग, धुके, सह्याद्रीच्या रांगा या सगळ्याचा आनंद या महिलांनी घेतला.

पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मुंबई-पुणे आदी शहरांतील ट्रेकर्स व पर्यटक देवकुंड व ताम्हणी घाटाला पसंती देत आहेत. परिणामी येथील छोटे-मोठे व्यावसायिक व गाईडही सुखावले आहेत.
- आंदेश दळवी, माजी उपसरपंच, पाटणूस

सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाचा बेत आखला आहे.
- प्रकाश मुद्राळे, खारघर

पाली ः घपकी येथील धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेणारे पर्यटक. (छायाचित्र ः अमित गवळे)
पाली ः देवकुंड येथे पर्यटक व ट्रेकर्सची गर्दी. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37558 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..