Mumbai : बहरलेल्या भात पिकाला संततधारेचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 rice crop
बहरलेल्या भात पिकाला संततधारेचा धोका

Mumbai : बहरलेल्या भात पिकाला संततधारेचा धोका

अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात शेतीसाठी पोषक वातावरण आहे. मात्र हा पाऊस असाच आणखी काही दिवस सुरू राहिल्यास बहरलेल्या भात पिकाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचण्याची शक्यता असून रोपे आडवी पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये सुमारे ९५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात कधी ऊन कधी रिमझीम पाऊस तर कधी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बदलत्या वातावरणाचा भात पिकांवर परिणाम होऊ लागला होता. जिल्ह्यातील काही भागात पिवळा खोडकिडा, सुरळीत आळी, निळे भुंगिऱ्याच्या प्रादुर्भाव सुरू झाला होता. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परंतु सहा सप्टेंबरपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावून गेल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस भात शेतीसाठी पोषक आहे. मात्र हा पाऊस सतत सुरू राहिल्यास भात रोपांना धोका निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भाताची रोपे बहरू लागली आहे. फुले, कणसे येण्याच्या मार्गावर भाताची रोपे आहेत. मात्र सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचण्याचे, कीड प्रादुर्भावाची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून शेतांमध्ये जास्त पाणी साचल्यास निचरा करण्यासाठी जागा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तयार भाताची रोपे आडवी पडू नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील कृषी सहायकांचा सल्ला घेऊन नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

भात शेतीला बहर येण्यास सुरुवात झाली आहे. दाणा भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. सध्या सुरू असलेला पाऊस भात पिकाला पोषक असून कीड रोगाचा परिणाम नसल्याचे चित्र आहे. मात्र सततच्या पावसामुळे शेतांमध्ये जास्त पाणी साचून रोपे आडवी झाल्यास भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतांमध्ये पाणी जास्त साचू न देता निचऱ्यासाठी मार्ग काढावा.
- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

सध्याचा पाऊस भात पिकाला समाधानकारक आहे. मात्र सतत पाऊस सुरू राहिल्यास तयार झालेल्या भात रोपांवर परिणाम होऊन रोपे कुजण्याची भीती अधिक आहे.
- सदानंद पाटील, शेतकरी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37576 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..