डम्पिंग ग्राऊंडमुळे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डम्पिंग ग्राऊंडमुळे आरोग्य धोक्यात
डम्पिंग ग्राऊंडमुळे आरोग्य धोक्यात

डम्पिंग ग्राऊंडमुळे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By

अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा

पाली, ता. २९ ः शहरातील शेकडो टन कचरा टेंबी वसाहतीजवळच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. मात्र संरक्षक भिंत नसल्याने कचरा मुख्य रस्त्यावर पसरत असल्‍याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डम्पिंग ग्राऊंडच्या आजूबाजूला शिक्षक व इतर वसाहती आहेत. आयटीआय व विद्युत महावितरण सबस्टेशन आहे. शिवाय गृहसंकुले आहेत. मढाळी व शिळोशी गावांना जाण्याचा हा मुख्य रस्ता आहे. मात्र कचरा रस्‍त्‍यावर येत असल्‍याने घाण व दुर्गंधीतून नागरिकांना नाक मुठीत घेऊन मार्गक्रमण व्हावे लागते.
फेब्रुवारी महिन्यात पाली ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. मात्र अजूनही घनकचरा व्यवस्थापनचा प्रश्न सुटलेला नाही. डम्‍पिंग ग्राऊंडवर असलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्‍‌याचे प्रमाण अधिक आहे. याच ठिकाणी भटके कुत्रे, मोकाट गुरांचा वावर असल्‍याने त्‍यांचेही आरोग्‍य धोक्‍यात आले असून अनेक जनावरे दगावली आहेत.

कचरा जाळला जात असल्‍याने प्रदूषण
डम्‍पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच शास्‍त्रीय पद्धत नाही. हा कचरा जाळला जात असल्‍याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. शिवाय धुरामुळे पर्यावरण व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पुनर्वापर व प्रक्रिया
प्लास्टिक बंदीचा कायदा करूनही प्लास्टिकचा भस्मासूर दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पाली नगरपंचायतीने शहरातील प्लास्टिक कचरा एकत्रित गोळा करून पुनर्वापर किंवा प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येईल, असे तज्‍ज्ञांचे म्हणणे आहे.

डम्पिंग ग्राऊंड व त्या बाहेर येणाऱ्या कचऱ्यासंदर्भात लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येईल. याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्‍या आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत आहोत.
- आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, पाली

नगरपंचायत कर्मचारी कचरा डम्‍पिंग ग्राऊंडमध्ये न टाकता रस्त्यालगत टाकतात. मोकाट गुरे, भटक्‍या कुत्र्यांमुळे तो कचरा रस्‍त्‍यावर पसरतो. पाली नगरपंचायतीने डम्‍पिंग ग्राऊंडला संरक्षक भिंत घालावी, जेणेकरून जनावरे आत जाणार नाहीत आणि कचराही रस्‍त्‍यावर पसरणार नाही.
- संजय घोसाळकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली

पाली ः डम्‍पिंग ग्राऊंडचा कचरा रस्त्यावर पसरला आहे. (छायाचित्र ः अमित गवळे)

पाली ः कचऱ्यात पडलेले अन्नपदार्थ गुरांकडून खाल्‍ले जाते. (छायाचित्र ः अमित गवळे)