जिल्ह्यात ४८२ अर्ज वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ४८२ अर्ज वैध
जिल्ह्यात ४८२ अर्ज वैध

जिल्ह्यात ४८२ अर्ज वैध

sakal_logo
By

अलिबाग, ता. २९ (बातमीदार) ः

रायगड जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात सरपंच पदासाठी ६४ व सदस्यांच्या ४२४ पदांसाठी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या छाननीत सरपंच पदाचा एक अर्ज अपात्र झाल्‍याने ६३ अर्ज वैध ठरविले आहेत. तसेच सदस्यांचे ५ अर्ज अपात्र झाल्‍याने ४१९ अर्ज वैध ठरले आहेत. एकूण ४८२ अर्ज पात्र ठरले असून सहा अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या अलिबाग तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, खालापूरमधील चौक, आसरे, लोधिवली, तुपगाव, पनवेलमधील खेरणे, पेणमधील कोपर, पोलादपूरमधील तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, महाडमधील खरवली, माणगावमधील देगांव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द, तसेच श्रीवर्धनमधील आदगाव, तसेच नव्याने स्थापन झालेल्या कर्जतमधील पोटल, पाली तर्फे कथल खलाटी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशन अर्ज भरण्यात आले. थेट सरपंच पदासाठी ६४ व सदस्य पदासाठी ४२४ असे एकूण ४८८ तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. दाखल केलेल्या अर्जांवरील छाननी बुधवारी तहसील कार्यालयात घेण्यात आली.
वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. कोण पात्र-अपात्र ठरतोय, याकडे लक्ष सर्वांचे लक्ष होते. दुपारी तीननंतर पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ४८८ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये नाराजी, तर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
नऊ तालुक्यांतील एकूण ग्रामपंचायतीमधील सुमारे ४८२ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यात अलिबाग तालुक्यात एक सरपंच व तीन सदस्य, पेणमध्ये पाच सदस्य, पनवेलमध्ये चार सरपंच ३६ सदस्य, कर्जतमध्ये सहा सरपंच व ३८ सदस्य, खालापूरमध्ये १५ सरपंच व १०२ सदस्य, माणगावमध्ये ११ सरपंच, ४२ सदस्य, महाडमध्ये सात सरपंच व ४४ सदस्य आणि पोलादपूरमध्ये ११ सरपंच व ५२ सदस्य; श्रीवर्धनमध्ये १२ सदस्य अर्जांचा समावेश आहे.
अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून उमेदवारांची अंतिम यादी दुपारी तीननंतर जाहीर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अलिबागमध्ये चार अर्ज अवैध
अलिबाग तालुक्यातील वेश्वी, कोप्रोली व नवगाव या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण १०१ अर्ज दाखल झाले होते. त्यात सरपंच पदासाठी दहा व सदस्यांसाठी ९१ अर्ज दाखल झाले होते. छाननीत चार अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यात सरपंच पदाचे एक व सदस्यांचे तीन अर्ज अवैध ठरविण्यात आले. नवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे एक व सदस्यांचे तीन उमेदवार अवैध ठरले.

दृष्टिक्षेप
ग्रामपंचायत संख्या -२०
सरपंच संख्या - २०
सरपंच पदासाठी दाखल अर्ज - ६४
सरपंच वैध अर्ज - ६३
अवैध अर्ज - १

एकूण सदस्य संख्या - १८४
सदस्य पदाचे दाखल अर्ज - ४२४
वैध ठरलेल्या सदस्यांचे अर्ज -४१९
अवैध ठरलेले अर्ज - ५