शिवसेनेतील गद्दारी भाजपपुरस्कृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेतील गद्दारी भाजपपुरस्कृत
शिवसेनेतील गद्दारी भाजपपुरस्कृत

शिवसेनेतील गद्दारी भाजपपुरस्कृत

sakal_logo
By

पाली, ता. २९ (वार्ताहर) : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी गद्दारी झाली असून ती भाजप पुरस्कृत आहे. भाजपवाल्यांच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही, अशी परखड टीका माजी खासदार अनंत गीते यांनी केली. ते गुरुवारी (ता. २९) पालीतील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

शिवसेना संपवण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करत आहेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता, ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका गीते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांची पर्वा करू नका. आज गद्दारांना खोक्यातून काही मिळेल, या आशेने शिंदे गटात काही जण जात असतील, पण शिवसेना लोकांच्या हृदयात आहे. विजय नेहमी सत्याचा होतो, आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता कोकणातील जनता पाच गद्दारांना कायमची मातीत गाडणार आहे. आज मुंबई महापालिका व विधानसभा निवडणुका झाल्या तर बंडखोरासोबत भाजपही धुळीस मिळेल. माझे वय ७२ वर्षे आहे; मात्र आमदारांनी गद्दारी केल्याने ते आता २७ झाले असे वाटते. आज केवळ शिवसेनेवर संकट नाही, तर संपूर्ण भारत देशासह लोकशाही संकटात आहे. आपल्याला लोकशाही वाचवायची असून न्यायदेवता योग्य तो न्याय देईल, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.

या मेळाव्याला रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ सल्लागार जिल्हा समन्वयक किशोर जैन, माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राऊत, महिला जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, सहसंपर्क प्रमुख नरेश गावंड, जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे, पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, मुंबईचे माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, दिनेश चिले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

दिशाभूल करणारी बंडखोरांची कारणे
सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे या मेळाव्यात दिनेश चिले यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, असे गीते यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले, की बंडखोर आमदारांनी दिलेली कारणे म्हणजे केवळ दिशाभूल करणारी आहेत. केवळ पैशांसाठी ते शिंदे गटात सामील झाले आहेत. भाड्याने घरात राहणारे भाडोत्री मालक होऊ शकत नाहीत.