भात पिकाला किड रोगाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात पिकाला किड रोगाचा धोका
भात पिकाला किड रोगाचा धोका

भात पिकाला किड रोगाचा धोका

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३ (बातमीदार)ः बदलत्या हवामानामुळे भात पिकांवर निळे भुंगेरे, तुडतुड्या, खोड किडासारख्या किडरोगाचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पेण, कर्जत, महाडसह काही तालुक्यांमध्ये किडरोग दिसून आले आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कृषी विभाग कामाला लागले आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसह शास्‍त्रज्ञ, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांच्या मदतीने गावागावांत शेतकऱ्यांना भेटून त्यावरील उपाय व किटकनाशके फवारणीसाठी जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये ९५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा पाऊस भात पिकांसाठी समाधानकारक पडल्याने भाताची रोपे तयार होऊ लागली आहेत. भाताला कणसे येण्याच्या मार्गावर आहेत. भाताची रोपे परिपक्व होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावून गेला आहे. मात्र अनेक दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वातावरणात आमूलाग्र बदल होत आहे. कधी कडक ऊन, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, अशा बदलत्या हवामानामुळे भात पिकांवर किडरोग आढळून येऊ लागले आहेत.
भातपीक तयार होऊन कापणीयोग्य तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर, महाड, पेण, कर्जत तालुक्यात खोडकिडा, तुडतुडे व अलिबाग, पोलादपूर तालुक्यात निळे भुंगेरे या किडरोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या किडरोगांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे.
जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी, कृषीतज्ज्ञ, शास्त्रज्ञ प्रत्यक्ष गाव भेटी देत आहेत. या किडरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत किडरोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पंधरा दिवसांत भात पिकांमध्ये खोडकिडा, तुडतुडे यासारखे किडरोग आढळून आले आहेत. या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना किटकनाशके फवारणी करण्याबाबत सल्ले देण्यात आले आहेत. गावातील शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत किड नियंत्रण उपाययोजनांबाबत सोशल मीडिया, अन्य आधुनिक साधन सामुग्रीच्या माध्यमातून सल्ले दिले जात आहेत. तसेच अन्य तालुक्यांमध्ये किडरोगांचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असून शेतकऱ्यांच्या शेतीशाळा, गाव बैठका, शास्‍त्रज्ञ भेटीदरम्यान शेतकऱ्यांमध्ये किडरोगाविषयी प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.
- उज्ज्वला बाणखेले, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

तज्‍ज्ञांची शेतांवर भेट
अलिबाग तालुक्यातील खंडाळे, कार्ले, कुरूळ, कुसुंबळे या भागात निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानुसार प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गावोगावी, जम्बो झेरॉक्समार्फत जनजागृती करण्यात आली आहे. निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून आल्यास भात खाचरातील पाणी व्यवस्थापन करणे, पाण्याचा निचरा होईल, पाणी वाहते राहील, पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घेणे, भात शेताच्या बांधावरील तणाचे व्यवस्थापन करणे, युरिया खताचा अवाजवी वापर टाळणे, खते विभागून देणे, भात पिकाची दाट लागवड करू नये, अशा सूचना अलिबाग तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आल्या.