अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीला आळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीला आळा
अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीला आळा

अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीला आळा

sakal_logo
By

अलिबाग, ता. ६ (बातमीदार) ः महामार्गासह शहरांतील मुख्य-अंतर्गत रस्‍त्‍यावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी रायगड पोलिसांच्या संकल्पनेतून वाहतुकीचे दहा गोल्डन नियम करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, राज्य महामार्ग जात जातात. याशिवाय महामार्गालगतच्या मुख्य-अंतर्गत रस्‍त्‍यांमुळे तालुका, गावे जोडली गेली आहेत. जिल्ह्यात अनेक प्रकल्प असून सरकारी, खासगी कार्यालये आहेत. शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरिक, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. काही जण सरकारी वाहनाने येतात; तर काही जण खासगी वाहनाने प्रवास येतात.
जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातही वाढले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून वाहतुकीचे दहा गोल्डन नियम लागू लागण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास अपघाताबरोबरच वाहतूक कोंडीही रोखता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबागमध्ये दिवसेंदिवस नागरीकरणाबरोबरच पर्यटकांचा ओघ वाढत आहे. शहरामध्ये वाहनांची वर्दळ वाढल्‍याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने प्रयत्न सुरू केले आहे. अलिबाग शहरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बालाजी नाका, मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, बाजारपेठ या परिसरात मोठी वर्दळ असते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे. समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पोलिस तैनात असतील. रात्रीच्या वेळी धूम स्टाईलने तसेच कर्णकर्कश आवाजाने वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

वाहतुकीचे गोल्‍डन नियम
- दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा.
- चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा.
- वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवू नये.
- मद्य प्राशन करून वाहन चालवू नये.
- वाहन चालविताना लेन कटिंग करू नये.
- पादचाऱ्यांनी पदपथाचा वापर करावा.
- वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये.
- रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहन चालवू नये.
- पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा.
- वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावा

वाहन चालविताना गोल्डन नियमांचे पालन केल्यास अपघात व वाहतूक कोंडी रोखता येणार आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना सहज समजतील, असे नियम आहेत. या नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे.
- अशोक दुधे, पोलिस अधीक्षक, रायगड