जंतमुक्तीसाठी आरोग्य विभागाचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंतमुक्तीसाठी आरोग्य विभागाचा जागर
जंतमुक्तीसाठी आरोग्य विभागाचा जागर

जंतमुक्तीसाठी आरोग्य विभागाचा जागर

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : जंत कृमीपासून रायगडमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह राज्य सरकार आरोग्य विभाग कामाला लागले आहे. १० ऑक्टोबरला झालेल्या मोहिमेमध्ये ग्रामीण भागात एक ते १९ वयोगटातील ८५ टक्के मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या आहेत. उर्वरित १५ टक्के मुला, मुलींना येत्या १७ ऑक्टोबरला गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अस्वच्छता, माती, दूषित अन्न आणि पाण्यातून जंत-कृमींचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांप्रमाणे प्रौढ व्यक्तींमध्येही कृमीचा त्रास होत असतो. जंत हे आतड्यात राहून त्यांची संख्या वाढवतात. आपल्या शरीरातील आहाररस, महत्त्वाची पोषकद्रव्ये, खनिज तत्वे, जीवनसत्व शोषून घेतात. जंत कृमीचा प्रसार झाल्यास पोटात दुखणे, पातळ जुलाब होणे अथवा शौचास साफ न होणे, उलट्या होणे, आतड्यातून रक्त शोषणे, अशक्तपणा निर्माण होतो. तसेच रक्तक्षयामुळे अन्य आजार शरीरात निर्माण होतात. सतत आजारपण अशा अनेक प्रकारचा त्रास होत असतो. विशेषकरून लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होतो. जंत कृमीचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जंत कृमीला रोखण्यासाठी ग्रामीण भागात ४ लाख ७० हजार अल्बेडॅझोल गोळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील ३ हजार ४६८ अंगणवाडी केंद्र, ३ हजार ९२ शाळा, तसेच ७५८ इतर शैक्षणिक संस्थांमधून झील गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक ते १९ वयोगटातील मुला-मुलींना ४ लाख ६० हजार गोळ्या उपलब्ध करून दिल्या. एक वर्षापर्यंत अर्धी, तर दोन ते १९ वर्षापर्यंतच्या मुलांना एक गोळी देण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीणसह शहरी भागातून तीन हजार ८४१ अंगणवाडी व तीन हजार ९२३ शाळा, महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेतून मुला-मुलींना गोळ्या वितरीत करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांचा सहभाग मोलाचा आहे.
जेवण झाल्यानंतर या गोळ्या चावून अथवा पाण्यात विरघळून घ्यायच्या असतात. त्याबाबत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. एका दिवसात ८५ टक्के मुला-मुलींना गोळ्या वाटण्यात आल्या. उर्वरित १५ टक्के मुला-मुलींना १७ ऑक्टोबरला गोळ्या दिल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.

जंतनाशक गोळी खाण्याचे फायदे
* जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो.
* बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते.
* मुले क्रियाशील बनतात व मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
* आरोग्य चांगले राहते.
* अल्बेडझोलच्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास मदत होते.

जंत कृमीला रोखण्यासाठी जिल्ह्यात १० ऑक्टोबरला जंतनाशक गोळी वाटप मोहीम राबवली आहे. एका दिवसात ८५ टक्के मुलांना गोळ्या वाटप केल्या आहेत. गोळ्या वाटप करण्यापूर्वी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेत योग्य प्रशिक्षण दिले. खबरदारी घेउन गोळ्या वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुदत संपलेल्या गोळ्या वाटप करू नये, अशी सक्त ताकीद जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. उर्वरित मुला-मुलींना १७ ऑक्टोबरला गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी