आंबेत-म्हाप्रळ पुलाच्या कंत्राटदाराची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेत-म्हाप्रळ पुलाच्या कंत्राटदाराची चौकशी
आंबेत-म्हाप्रळ पुलाच्या कंत्राटदाराची चौकशी

आंबेत-म्हाप्रळ पुलाच्या कंत्राटदाराची चौकशी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे; मात्र काही महिन्यांतच हा पूल पुन्हा नादुरुस्त झाला. त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग येथे दिली.

श्रीवर्धन, म्हसळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-मंडणगड या तालुक्यांना रहदारीसाठी म्हाप्रळ-आंबेत पूल महत्त्वाचा आहे. या मार्गावर प्रवासी बस नेता येत नसल्याने प्रवाशांना महाडमार्गे जावे लागते. यातून वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे म्हाप्रळ-आंबेत दरम्यान सुरू करण्यात आलेल्या रो-रो मधून मोठ्या प्रवासी वाहनांना परवानगी द्यावी, अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील नागरिक करीत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पुलाच्या दुरुस्तीचे ११ कोटी रुपयांचे काम संपत आले असतानाच पाचव्या क्रमांकाचा खांब पूर्णपणे नादुरुस्त झाला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाची दुरुस्ती अगदी निकृष्ट दर्जाची झाली असल्याची नागरिकांनी तक्रार केली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्येही हेच निष्पन्न झाले. त्यामुळे झालेल्या दुरुस्ती कामाची चौकशी केली जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

नव्याने दुरुस्तीच्या कामासाठी निविदा
पुलाचे काम ठाणे येथील संरचना कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. त्यासाठी ११ कोटी रुपये मंजूर झाले होते; मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. दुरुस्तीनंतर केवळ चारच महिन्यांत हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद ठेवावा लागला होता. राज्य सरकारने पुन्हा १० कोटींचा निधी मंजूर केला. हे दुरुस्तीचे काम अद्यापही निविदा प्रक्रियेतच आहे. ही प्रक्रिया आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती महाड बांधकाम विभागातून देण्यात आली.

बस वाहून नेण्यासाठी रो-रोची क्षमता तपासणार
सध्या म्हाप्रळ-आंबेतदरम्यान रो-रो सेवेने नागरिकांची वाहतूक विनामूल्य करावी लागत आहे. या रो-रोची भारक्षमता तपासून प्रवासी बस सुरू करता येतील का, याची चाचपणी केली जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.