आज ग्रामपंचायतीचे मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज ग्रामपंचायतीचे मतदान
आज ग्रामपंचायतीचे मतदान

आज ग्रामपंचायतीचे मतदान

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वेश्वी व नवेदर नवगाव या दोन ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी (ता.१६) होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तालुका प्रशासन व पोलिस सज्ज आहेत. आठ केंद्रांवर मतदान होणार असून शनिवारी दुपारी अलिबाग तहसील कार्यालयातून मतदान केंद्राकडे कर्मचारी रवाना झाले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानासाठी लागणारे साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक व सदस्य पदासाठी ११ अशा एकूण १२ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सरपंचपदासाठी दोन उमेदवारांचा समावेश आहे. वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, सदस्यपदाच्या प्रभाग एकमधील तीन जागांसाठी सहा उमेदवार, प्रभाग दोनमध्ये तीन जागांसाठी सहा उमेदवार, प्रभाग तीनमध्ये दोन जागांसाठी चार उमेदवार व प्रभाग चारमध्ये तीन जागांसाठी सहा उमेदवारांची लढत होत आहे.
वेश्वी ग्रामपंचायतीवर ४० वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता आहे. या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी सर्व पक्ष विरुद्ध शेकाप अशी लढत आहे. सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी चार केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यात वेश्वीमध्ये दोन व गोंधळपाड्यात दोन मतदान केंद्रांचा समावेश आहे. हे केंद्र संवेदनशील असल्याने पोलिसांचा कडेकोट पहारा असेल. तसेच नवेदर नवगाव ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून प्रशासक आहे. पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सरपंचपदाच्या एक जागेसाठी दोन उमेदवार, प्रभाग एकमधील सदस्य पदाच्या तीन जागांसाठी सहा उमेदवार, प्रभाग दोनमधील तीन जागांसाठी सहा उमेदवार, प्रभाग तीनमधील दोन जागांसाठी चार व प्रभाग चारमधील तीन जागांसाठी सहा उमेदवार असे एकूण सरपंचांसह सदस्य पदाच्या १२ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

नवेदर नवगाव व वेश्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी एकूण आठ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. याठिकाणी राखीव दोन मशीन उपलब्ध आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलिस असे एकूण ४८ अधिकारी-कर्मचारी आहेत. वेश्वी मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तीन निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक व २९ पोलिस कर्मचारी बंदोबस्‍तासाठी आहेत.


वेश्वी आणि नवेदर नवगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी शांततेत मतदान करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- मीनल दळवी, तहसीलदार, अलिबाग