दिवाळीसाठी एसटीच्या जादा गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीसाठी एसटीच्या जादा गाड्या
दिवाळीसाठी एसटीच्या जादा गाड्या

दिवाळीसाठी एसटीच्या जादा गाड्या

sakal_logo
By

अलिबाग, ता. १६ (बातमीदार) ः दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. सुटीत सणानिमित्त अनेक जण मूळ गावी जाण्याची तयारी करतात. यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने जादा एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी १७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत एसटीच्या १२४ जादा फेऱ्या सोडणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दिवाळीत शाळा, महाविद्यालयांना सुटी असते. त्‍यामुळे मूळ गावी जाण्याबरोबरच मुंबई, बोरिवली, ठाणे अशा अनेक ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यंदा दिवाळी २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत साजरी केली जाणार आहे. अलिबाग, महाड, रोहा, मुरूड, माणगाव, पेण, श्रीवर्धन या एसटी बस आगारातून जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये आंबेजोगाई, कोल्हापूर, अक्कलकोट, भांडुप, कल्याण, पनवेल, उमरगा, जळगाव, लातूर, भाईंदर, धुळे, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बोरिवली, मुंबई या ठिकाणी ३६ एसटी बस पाठविल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार, मुरूड-पनवेल, अलिबाग-पनवेल तसेच थांबा असणाऱ्या अलिबाग-पनवेल या एसटी बस सुरू केल्या जाणार आहेत.
महाड एसटी आगारातून १६, अलिबाग आगारातून १४, पेण आगारातून २६, रोहा आगारातून १०, कर्जत आगारातून सहा, मुरूड आगारातून १४, श्रीवर्धन आगारातून १३ व माणगाव आगारातून १६ जादा फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांची संख्या वाढत असल्‍याने जादा एसटी फेऱ्या सुरू करण्याची व्यवस्था केली आहे.

ऐन दिवाळीत तिकीट महाग
दिवाळीत बहुतांश व्यक्‍ती मूळ गावी जातात. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे; मात्र ऐन दिवाळीत एसटीचे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. २० ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तिकीट दरात १० टक्क्‍यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

एसटी प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी आठ एसटी बस आगारातून जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. लांब पल्ल्यासह विनाथांबा एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेचा प्रवाशांनी पुरेपूर लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटी बसनेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
- दीपक घोडे, विभाग नियंत्रक
राज्य परिवहन महामंडळ, रायगड