रायगडमध्ये शेकापला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये शेकापला धक्का
रायगडमध्ये शेकापला धक्का

रायगडमध्ये शेकापला धक्का

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाला १६ ग्रामपंचायत निवडणूक निकालात मोठी हार पत्करावी लागली. पनवेल आणि अलिबाग या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात शेकापला आपल्या हक्काच्या ग्रामपंचायती गमवाव्या लागल्या; तर शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतरही दोन्ही गटांच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत खालापूर, पोलादपूर आणि अलिबाग तालुक्यांतील ग्रामपंचायतींवर आपला दावा ठोकला आहे.

बहुतांश निवडणुका या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या गेल्या; मात्र निकालानंतर प्रत्येक पक्ष आपापला दावा करू लागला आहे. यात शिंदे गट आघाडीवर आहे; मात्र महाडचे आमदार भरत गोगावले यांचे मतदान असलेल्या खरवली ग्रामपंचायतीवर भरत गोगावले यांना आपल्या पक्षाचा सरपंच निवडून आणता आला नाही. अलिबागमध्ये शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आपली वेश्वी ग्रामपंचायत गमवाली. मधील अडीच वर्षांचा कालावधी सोडल्यास वेश्वी ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील नवगाव आणि पनवेल तालुक्यातील एकमेव झालेल्या खेरणे ग्रामपंचायतीमध्येही शेकापला पराभव पत्करावा लागला. खेरणे ग्रामपंचायत २५ वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होती. तेथे भाजपने विजय मिळवला. खालापूर तालुक्यात शिंदे गटाला हार पत्करावी लागली. या भागात उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व वाढत असल्याचे चारही ग्रामपंचायतींमध्ये दिसून येत आहे. यातील काही ग्रामपंचायती या विधानसभेच्या उरण मतदार संघात येतात, त्यामुळे भाजपचे आमदार महेश बालदी यांनाही हा धक्का असल्याचे समजले जात आहे.

कोट
-----------------
शेतकरी कामगार पक्षाची जादू उरल्या-सुरल्या अलिबाग तालुक्यातूनही गायब होत आहे. आगामी पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन प्रस्तापितांना धूळ चारू. ही खरी परिवर्तनाची चाहूल असल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे.
- आमदार, महेंद्र दळवी, शिवसेना शिंदे गट

ग्रामपंचायतींची पक्षीय स्थिती
शिवसेना (शिंदे गट) - ४
शिवसेना (उद्धव गट) - ३
शेकाप - २
राष्ट्रवादी - १
स्थानिक विकास आघाडी - ५
भाजप - १
एकूण - १६