पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर पाणी
पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर पाणी

पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर पाणी

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
परतीच्या पावसाचा मुक्‍काम वाढल्‍याने जिल्ह्यात सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर काहीसे पाणी फेरले जात आहे. काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात धुडगूस घातला आहे. पावसामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली आहे. फटाके विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच पावसामुळे हातातोंडाची आलेले भातपीकही धोक्‍यात आले आहे. त्‍यामुळे बळिराजा चिंतेत आहे.
व्यापारी व दुकानदारांनी दिवाळीसाठी लाखो रुपयांचा माल भरून ठेवला आहे. परंतु ग्राहक नसल्याने ऐन दिवाळीत वस्‍तूंना उठाव नाही. त्यामुळे व्यावसायिक पुरते हवालदिल झाले आहेत. कापणीला आलेला भात शेतातच आहे. सुगीच्या दिवसांना अजून सुरुवात झालेली नाही. त्यात परतीच्या पावसाने भाताचे पुरते नुकसान केले आहे. त्यामुळे हाती पैसा नसल्‍याने शेतकरी काहीसा धास्‍तावला आहे.
महिना अखेर दिवाळी आल्‍याने अनेकांचा हिशोब आणि ताळेबंद बिघडला आहे.
आकाशकंदील, इलेक्ट्रिक वस्तूंपासून, मिठाई, फराळ सर्वच वस्‍तूंच्या किमती १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्‍या आहेत. पावसामुळे वस्तू प्रदर्शनासाठी दुकानाबाहेरही ठेवता येत नाहीत. त्‍यामुळे विद्युत रोषणाई, आकाशकंदील कुठे लावावे, रांगोळी कुठे काढावी, फटाके कुठे फोडावेत हे प्रश्न अनेकांना पडला आहे.

ग्रामीण भागात खरेदीत हात आखडता
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच वस्‍तूंच्या किमती २० ते ३० टक्‍क्यांनी वाढल्‍या आहेत. कोरोना, महागाईमुळे ग्रामीण भागात ग्राहकांनी खरेदीसाठी हात आखडता घेता आहे. शिवाय पावसामुळेही सायंकाळी बाजारात शुकशुकाट जाणवत असल्‍याचे पालीतील मुकुंद कोसुंबकर दुकानदाराने सांगितले.