जिल्ह्यात होणार स्वच्छतेचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात होणार स्वच्छतेचा जागर
जिल्ह्यात होणार स्वच्छतेचा जागर

जिल्ह्यात होणार स्वच्छतेचा जागर

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ : जागतिक शौचालय दिन १९ नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून स्वच्‍छतेत सातत्य राहण्यासाठी आणि गावांचा हागणदारीमुक्तीचा दर्जा टिकवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
जागतिक शौचालय दिनाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर बैठकाचे आयोजन करून वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान मागणीसाठी ऑनलाइनद्वारे प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे, प्रलंबित वैयक्तिक शौचालय पूर्ण करून प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करणे, एक खड्डा शौचालयाचे दोन खड्ड्यात रूपांतर करणे, विविध स्वयंसेवी संस्था व शासकीय विभागांच्या सक्रिय सहभागासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत ग्रामपंचायतींना भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाव स्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ट पूर्ततेकरिता सूक्ष्म नियोजन करून कामे पूर्ण केली जाणार आहेत. याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन पूर्ण करून स्वच्छतेची मोहीम यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.

प्रत्येक गावात मोहीम
स्वच्छता मोहीम अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व शौचालयातील मैला गाळ व्यवस्थापन योग्य प्रकारे होण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मैला गाळ व्यवस्थापन सुविधेसाठी शहराच्या दहा किलोमीटर परिसरातील गावांना या सुविधेत जोडण्यासाठी नियोजन करणे, गोबरधन प्रकल्प, शोषखड्डा बांधकाम, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांना बायोडायजेस्टर सिस्टीम बसवणे, घंटागाडीची सुविधा आदी उपक्रम राबवून जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे.
..............