सात महिन्यांत ४९ बालके दगावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात महिन्यांत ४९ बालके दगावली
सात महिन्यांत ४९ बालके दगावली

सात महिन्यांत ४९ बालके दगावली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना उपचारांसाठी जिल्‍हा रुग्णालयाचा आधार वाटतो; मात्र अलिबाग जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे. रुग्‍णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोमवारी (ता. ७) तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची भयावह घटना समोर आली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत ४९ बालके जन्माला येताच काही तासांतच दगावल्‍याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.

जिल्हा रुग्णालयात सोमवारी प्रसूतीसाठी आलेल्या तीन महिलांची प्रसूती व्यवस्थित झाली; परंतु काही वेळातच त्यांचे बाळ दगावले. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबद्दल मृत्‍युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांनी आक्रोश केला; मात्र त्याची दखल घेण्यास कोणीही पुढे आले नाही. रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळत होते. अखेर या नातेवाईकांनी बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीही जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी धाव घेतली. या वेळी प्रसूती कक्षातील आरोग्य व्यवस्था पाहून संताप व्यक्त करत कारभार सुधारण्याचे अल्टिमेटम दिले. गेल्या सात महिन्यांत २,०८८ गर्भवती प्रसूतीसाठी आल्या होत्या, त्यापैकी ४९ बालकांचा मृत्यू झाल्याचे भयावह सत्य समोर आले आहे.

बालके दगावल्याच्या घटना वारंवार घडत असल्‍याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त करत बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना जाब विचारला. या अनागोंदी कारभाराबद्दल आरोग्य विभाग वेळीच जागा न झाल्‍यास आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही मानसी दळवी यांनी दिला.

१३ कोटी रुपये खर्च करूनही रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था कधीही कोसळेल अशी आहे. कागदोपत्री जास्त कंत्राटी नेमणुका करून प्रत्यक्षात कमी कर्मचारी कामावर हजर असतात. याचा फटका नवजात बालकांना बसत असेल तर त्याचा उद्रेक होईलच.
- राजा केणी, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

सुनेला दिलेल्या तारखेपूर्वीच प्रसूती कळा येऊ लागल्यामुळे आम्ही रुग्णालयात आल्यावर नर्सने तपासण्या करून घेत अॅडमिट केले होते. बराच वेळ झाल्यानंतरही प्रसूती होत नसल्याने विचारल्यानंतर नर्सने सांगितले, की बाळाची प्रकृती नाजूक आहे. दुसऱ्या डॉक्टरांना बोलावत आहोत. दुसरे डॉक्टर आल्यानंतर पाचसहा तासांनी बाळ मृत असल्याचे सांगितले.
- सुनीता पाटील, रुग्णांची नातेवाईक

रुग्णालयात अनुभवी डॉक्टर नसल्याने शल्यचिकित्सकांच्या आग्रहावरून मी येथील डॉक्टरांना माझ्या निवृत्तीनंतरही मार्गदर्शन करतो. ही माझी कंत्राटी स्वरूपातील नोकरी आहे. प्रसूतीमध्ये काही क्लिष्टता निर्माण झाल्यानंतरच मला बोलावले जाते.
- डॉ. अनिल फुटाणे, प्रसूतीतज्ज्ञ

आज माझी सुट्टी असूनही काम करत आहे, परंतु अशा प्रकरणात फक्त सीएस म्हणून मला दोषी ठरवले जात आहे. रुग्णालयाच्या परिस्थितीवर या विषयावर मला काहीही बोलायचे नाही.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्हा रुग्णालयातील मृत्युमुखी बालके
महिना प्रसूतीसाठी आलेल्या महिला मृत बालके
एप्रिल ३१६ १३
मे २८० ७
जून २६९ ७
जुलै २६३ ४
ऑगस्ट ३१४ ६
सप्टेंबर ३२० ८
ऑक्टोबर ३२६ ४
एकूण २०८८ ४९