प्रशिक्षित उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षित उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत
प्रशिक्षित उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत

प्रशिक्षित उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) ः सरकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळण्याची आशा रायगड जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना आहे, परंतु प्रतीक्षा यादीत नाव असतानाही नोकरी वर्षोनुवर्षे नोकरी मिळत नसल्‍याने तरुण आक्रमक झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सरकारी सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्यासाठी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत २०१९ मध्ये एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. तर प्रत्‍यक्षात जवळपास तीन हजार २०० उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र भरती केलेल्यांपैकी फक्त ४०० जणांनाच आजपर्यंत नोकरीत सामावून घेण्यात आले.
प्रतीक्षा यादीत असणारे उमेदवार तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक मंडळाकडे पाठपुरावा करीत आहेत, परंतु जागा निघतील त्‍याप्रमाणे भरल्या जातील, असे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात येत आहे. तीन वर्षांपासून केवळ आश्‍वासनांवर बोळवण करण्यात येत असल्‍याने संतापलेल्‍या उमेदवारांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.
तेजेश पाटील यांच्या नेतृत्वात व सुरक्षा रक्षक तसेच समाजसेवक व संस्थापक रवींद्र भले, दीपक भवार, सुनीता तिखे, अनिता जगताप(भले) यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकारी, निरीक्षक यांच्या सोबत नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रलंबित प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली, मात्र मंडळ प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही.

कामगार आयुक्‍तांना निवेदन देणार
सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी मनमानी कारभार करीत असल्‍याचा आरोप तेजेश पाटील व शिष्‍टमंडळाने केला. याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्‍यास प्रतीक्षा यादीवरील उमेदवार एकत्र येत रस्त्यावर उतरून निदर्शने करणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. याबाबत कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, कामगार मंत्री, उपकामगार आयुक्त, रायगड आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले जाणार आहे.

अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून सेवा मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र कोणतीही ठोस भूमिका सुरक्षा रक्षक मंडळाकडून घेण्यात आलेली नाही. संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाची भूमिका असणार आहे.
- रवींद्र भले, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक हक्क संघटना