डांबरी रस्ता दाखवा, भरघोस बक्षीस मिळवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांबरी रस्ता दाखवा, भरघोस बक्षीस मिळवा!
डांबरी रस्ता दाखवा, भरघोस बक्षीस मिळवा!

डांबरी रस्ता दाखवा, भरघोस बक्षीस मिळवा!

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) : ऐतिहासिक सुधागड किल्ल्याकडे जाणाऱ्या पाच्छापूर फाटा ते दर्यागाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या, निवेदने देऊन झाली; मात्र काहीही फरक पडत नाही. अखेर संतप्त व त्रासलेल्या गावकऱ्यांनी पाच्छापूर ते पाच्छापूर फाटा सलग पाच मीटर डांबरी रस्ता दाखवा आणि भरघोस बक्षीस मिळवा!, अशी एक अनोखी घोषणा केली आहे. फेसबुकवर या रस्त्याचा व्हिडीओ शेअर करून ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व रायगडचे पालकमंत्री यांना टॅग करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण किल्ला सुधागडकडे जाणार हा मार्ग आहे. या रस्त्यावर ११ गावे आणि वाड्या अवलंबून आहेत. शिवाय पर्यटनाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर आता फक्त दगड, खडी व मातीच शिल्लक आहे. यावरून प्रवास करणे अतिशय जिकरीचे व धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपासून या रस्त्याच्या नूतनीकरणासंदर्भात अनेक पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. मात्र, संबंधित खात्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे, असे उमेश तांबट यांनी सांगितले. रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित खात्याने कोणतेही पाऊल न उचलल्यास ११ गावे व वाड्यांतील ग्रामस्थ लवकरच आंदोलन करणार आहेत. मागील आठवड्यातच ग्रामस्थ रायगड जिल्हा परिषद उपअभियंता यांच्या पाली येथील कार्यालयात गेले होते. तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने अन्य कोणीही दखल घेतली नाही. त्यावर संतप्त ग्रामस्थांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले. या आधीही ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र, सरकारचे याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पाच्छापूर ते पाच्छापूर फाटा सलग पाच मीटर डांबरी रस्ता दाखवा आणि भरघोस बक्षीस मिळवा!, अशी अनोखी घोषणा करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. निवेदन देतेवेळी उमेश तांबट, संतोष बावधाने, रोशन बेलोसे व खुमाजी बर्गे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पाच्छापूर फाटा ते दर्यागाव रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यास लगेच कामाला सुरुवात करून नागरिकांची गैरसोय दूर केली केली जाईल. पाली कार्यालयात मी दर बुधवारी नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित असतो.
- व्ही. बी. नाईक, उपअभियंता, रायगड जिल्हा परिषद, विभाग पेण