ग्रामपंचायतींत राजकीय हालचालींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतींत राजकीय हालचालींना वेग
ग्रामपंचायतींत राजकीय हालचालींना वेग

ग्रामपंचायतींत राजकीय हालचालींना वेग

sakal_logo
By

अलिबाग, ता. १० (बातमीदार) ः ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात अलिबाग तालुक्यातील आक्षी, नारंगी, बोरिस, मुळे-वैजाळी व शिरवली या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ग्रामपंचायतीचे मतदान १८ डिसेंबरला; तर मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ग्रामपंचायत निवडणुका रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते या निवडणुकीत आपली सत्ता निर्माण करण्याबरोबरच सत्ता कायम टिकून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर ही उत्कंठा संपली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन अर्ज सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत तहसील कार्यालयात स्‍वीकारण्यात येणार आहेत. अर्जाची छाननी ५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर आहे; तसेच अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यापासून चिन्ह वाटपदेखील त्याच दिवशी असणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, ठाकरे गट (उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना), शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना), काँग्रेस, भाजप, शेकाप, वंचित बहुजन आघाडी अशा वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गावभेटी सुरू झाल्या आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतून प्रयत्‍न सुरू झाले आहेत.
निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर आपली सत्ता टिकून ठेवण्याबरोबरच अन्य ग्रामपंचायतींही हिसकावून घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायती
अलिबाग - ६
उरण - १८
कर्जत - ७
खालापूर - १४
तळा - १
पनवेल - १०
पेण - २६
पोलादपूर - १६
महाड - ७३
माणगाव - १९
मुरुड - ५
म्हसळा - १३
रोहा - ५
श्रीवर्धन - १३
सुधागड - १४
--------
एकूण - २४०


जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शेतकरी कामगार पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार आहे. गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू आहेत. उमेदवार निश्चित करण्याचे कामही जोरात सुरू आहे.
- पंडित पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती लढणार आहोत. गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू आहेत. या निवडणुकांवर आमच्या पक्षांचा झेंडा फडकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहोत
- सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

शेतकरी कामगार पक्षाविरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढणार आहेत. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या जाणार आहेत. उमेदवार निवडीसह मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी गावोगावी बैठका सुरू झाल्‍या आहेत.
- राजा केणी, जिल्हाप्रमुख, शिंदे गट

वरिष्ठांच्या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील स्थानिक घडामोडीनुसार कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक लढविली जाणार आहे. त्यानुसार बैठका, चर्चा सुरू आहेत. जिल्ह्यासह अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राबल्या कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे.
- अमित नाईक, अध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघ