निधी मंजूर, तरीही रस्‍त्‍याची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधी मंजूर, तरीही रस्‍त्‍याची रखडपट्टी
निधी मंजूर, तरीही रस्‍त्‍याची रखडपट्टी

निधी मंजूर, तरीही रस्‍त्‍याची रखडपट्टी

sakal_logo
By

अलिबाग, ता. २४ (बातमीदार) ः राज्य महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबाग-रोहा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. वर्ष-दीड वर्षापूर्वी कामासाठी एजन्सी नेमण्यात आली, निधीही मंजूर करण्यात आला आहे; मात्र अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नेमलेल्‍या एजन्सीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली नाही. प्रशासनाच्या अनास्थेमुळे खड्डेमय रस्त्यातील प्रवास नागरिकांसह चालकांना नकोसा झाला आहे.
अलिबाग- रोहा या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय आहे. गणेशोत्सव, शिमग्‍याला लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात याच मार्गाने दाखल होतात, त्‍या वेळी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते; मात्र त्‍यानंतर रस्‍त्‍याची स्‍थिती जैसे थे होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्‍त्‍यावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. खडी बाहेर आली आहे. त्यात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे मानेचे, कंबरेचे, पाठीच्या व्याधी बळावत असल्‍याचे प्रवासी, चालक सांगतात. याशिवाय धुळीमुळे खोकला, घसा दुखणे, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्‍याच्या तक्रारी महामार्गालगतच्या स्‍थानिकांकडून करण्यात येत आहेत.
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या अंतर्गत मंजूर होऊन अनेक वर्षे झाली आहेत. अलिबाग-रोह्यापासून पुढे सुमारे ७० किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यासाठी १७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गुजरातमधील एका एजन्सीला हे काम देण्यात आले आहे.
अलिबाग-सुडकोली दरम्यान नांगरवाडीजवळच एजन्सीने रस्त्यासाठी लागणारे साहित्‍य तयार करण्यासाठी प्लांट उभारला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव करून मशिनरी बसवल्‍या आहेत. या कामासाठी टक्केवारीनुसार सुमारे १८ कोटी रुपयेदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने एजन्सीला वर्ग केले. त्‍यामुळे लवकरच रस्त्याचे काम होणार, अशी अपेक्षा प्रवाशांना होती; परंतु जवळपास दोन वर्षे होत आली, तरी रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही. रुंदीकरणाबरोबरच मजबुतीकरण, डांबरीकरण करून रस्ता तयार केला जाणार आहे; परंतु प्रत्‍यक्षात कामाला कधी मुहूर्त लागणार, याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी शेकाप आक्रमक
अलिबाग-रोहा रस्त्याचे कामासाठी ठेकेदार कंपनीला आगाऊ १८ कोटी रुपयांची रक्‍कम देण्यात आली आहे, त्‍यानंतर ही कंपनी संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे समजल्‍याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली होती. कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांना जाब विचारत ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून १८ कोटी वसूल करण्याची मागणी केली. १० दिवसांत रस्त्याचे काम सुरू केले नाही तर अधिकार्‍यांना कार्यालयात बसून देणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला.

जनहित याचिका दाखल करणार
तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरूच होत नाही; तर कंत्राटदार १८ कोटी रुपये घेऊन परागंदा झाला आहे. त्यामुळे सतत निवेदने देऊन, आंदोलने करून काहीही फरक पडत नाही. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत जनहित याचिका दाखल करणार असल्‍याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांनी सांगितले. तसेच या जनहित याचिकेते कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व अधिकाऱ्‍यांना प्रतिवादी करणार असल्याचेही ते म्हणाले.

एजन्सीला आठ वेळा नोटिसा
रस्त्याचे काम सुरू करण्यास कंपनी टाळाटाळ करीत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिन्यांत आतापर्यंत आठ वेळा नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाकडून मिळाली आहे; मात्र नोटिशीलाही कंपनी उत्तर देत नसल्याचे समोर आले आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत कंपनीला अनेक वेळा सांगण्यात आले आहे. त्यांना नोटिसाही पाठविण्यात आल्‍या आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची लवकरच डागडुजी करण्यात येणार आहे.

- राजेंद्र डोंगरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग