विद्यार्थ्यांना स्‍वरक्षणाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना स्‍वरक्षणाचे धडे
विद्यार्थ्यांना स्‍वरक्षणाचे धडे

विद्यार्थ्यांना स्‍वरक्षणाचे धडे

sakal_logo
By

अलिबाग, ता. १३ (बातमीदार)ः अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी पुढाकार घेतला आहे. यात खासगी शाळांबरोबरच जिल्‍हा परिषदेच्या शाळांचाही समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जात असल्‍याने पालकांचा मुलांना जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे. पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्याला प्राधान्य दिले जात आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त मैदानी खेळाची माहिती मिळावी. त्‍यांचे मानसिक व शारीरिक स्‍वास्‍‍थ्य सक्षम राहावे. वैचारिक सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांनीही यासाठी पुढाकार घेत शाळेतील मुलांना मोफत प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील सासवणे, दिघोडे, कोप्रोली, वायशेत, कुरूळ येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्‍वरक्षणाचे धडे दिले जात आहेत. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस यासाठी विशेष वर्ग घेतले जातात.

ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला-मुलींना स्वरक्षणाचे धडे मिळणे ही काळाची गरज आहे. काही जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक स्वरूपात कराटेचे प्रशिक्षण सुरू केले आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- संतोष कवळे, कराटे प्रशिक्षक

शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना अभ्यासाबरोबरच कराटेचे धडे दिले जात आहेत. दर शनिवारी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यातून विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होत आहे.
- रिना मळेकर-पाटील, डिव्हाईन इंग्लिश स्कूल, वावे

विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम बनला पाहिजे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष करून मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला आहे. आगामी आर्थिक वर्षात याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न आहे. सीएसआरमार्फत विद्यार्थी, विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असल्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून त्यांना मान्यता देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग