शिंदे सरकारमधील मंत्र्यांची भाषा आक्षेपार्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे सरकारमधील मंत्र्यांची भाषा आक्षेपार्ह
शिंदे सरकारमधील मंत्र्यांची भाषा आक्षेपार्ह

शिंदे सरकारमधील मंत्र्यांची भाषा आक्षेपार्ह

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) ः शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री सातत्याने बेताल व आक्षेपार्ह वक्तव्यातून महिला भगिनींचा अवमान करताना दिसतात. ही बाब सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अशोभनीय आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळात ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी म्हणण्याची वेळ आल्‍याची टीका टीका खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. रविवारी पालीतील मराठा समाज सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाली नगरपंचायत ते मराठा समाज सभागृहापर्यंत रॅलीही काढण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेले महत्त्वाकांक्षी व जनहिताचे कल्याणकारी निर्णय नव्याने आलेले सरकार बदलत आहेत. महाराष्ट्रात झालेले सत्तांतर राज्यातील जनतेला रुचले नसल्‍याचे तटकरे यांनी स्‍पष्‍टपणे मांडले. त्‍यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचेही कौतुक केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, ग.रा. म्हात्रे, प्रकाश कारखानीस, सुरेश ठोंबरे, बाळा मराठे, राकेश शिंदे, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, माजी पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, महिला अध्यक्ष रूपाली भणगे, नगरसेवक सुलतान बेणसेकर, सुधीर भालेराव, आशिक मणियार, नलिनी म्हात्रे, मधुरा वरंडे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन
सुधागड तालुक्यातील आगामी १४ ग्रामपंचायत निवडणुकीची व्यूहरचना व रणनीतीसंदर्भात तटकरे यांनी पदाधिकारी-कार्यकर्‍त्‍यांना मार्गदर्शन केले. पक्ष सोडू पाहणाऱ्यांनाही त्‍यांनी आर्त साद घातली. कार्यक्रमात अंकुश आपटे व इतर तरुण कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अबाधित
सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाली नगरपंचायत नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा भाजपच्या वाटेवर आहेत. तसेच त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपसह जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचे भाकीत वर्तविले जात होते. मात्र मेळाव्यात ही सर्व भाकिते खोटी ठरली आहेत. गीता पालरेचा यांचे वडील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल हे स्वतः सुनील तटकरे यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित होते. आजारी असताना व वार्धक्याने थकले असतानाही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुनील तटकरे यांनी वसंतराव ओसवाल यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक केले.