ठाकरी मिरचीचा बाजारात ठसका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरी मिरचीचा बाजारात ठसका
ठाकरी मिरचीचा बाजारात ठसका

ठाकरी मिरचीचा बाजारात ठसका

sakal_logo
By

अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा

पाली, ता. २१ (वार्ताहर)ः जिल्ह्यात ठाकूर, आदिवासी बांधवांकडून डोंगर-उतारावर भाजीपाला लागवड केली जाते. यात प्रामुख्‍याने ठाकरी मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून हे पारंपरिक वाण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा तिखटपणा, वैद्यकीय गुणधर्म आणि अनोख्या चवीमुळे मिरचीला ग्राहकांकडून मागणीही खूप आहे.
रायगड जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. उदरनिर्वाहासाठी आदिवासी बांधव लाकूडतोड, मजुरीबरोबरच डोंगर- उतारावर लाल मातीमध्ये गावठी पालेभाज्या, काकडी, भोपळा व मिरचीचे पीक घेतात. जूनमध्ये पावसाच्या पाण्यावर ठाकरी मिरचीच्या गावठी वाणाची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते.
सध्या ठाकरी मिरचीचे भरघोस पीक आले असून गाव, तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी आदिवासी महिला गावठी भाज्यांसह गावठी ठाकरी मिरची विक्रीसाठी येत आहेत. वाट्याला दहा रुपये भाव असून त्यात साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम मिरची येते. काही वेळेला भाव केल्यास २० रुपयांमध्ये तीन वाटे मिळतात. मेहनतीच्या मानाने हा भाव अतिशय कमी असतो. पावसाच्या पाण्यावरच ही पिके घेतली जात असून इतर हंगामात ठाकरी मिरची पिकत नसल्‍याचे शेतकरी राजू बांगारे यांनी सांगितले.

मिरचीची चव न्यारी
चवीला अतिशय तिखट असलेली ही मिरची अनेक जण तेलात तळून खातात. हळद-मीठ टाकून सुकवून, तसेच लोणचे करूनही मिरची खाल्ली जाते. ठेचा किंवा चटणी-भाकरी म्‍हणूनही अनेक जण ठाकरी मिरचीलाच पसंती देतात.

वैद्यकीय फायदे
तापामध्ये किंवा आजारपणात ग्रामीण भागात तोंडाला चव येण्यासाठी मीठ व मिरचीचा ठेचा करून खाल्ला जातो. ठेच्याला आदिवासी भाषेत रिठा असे म्हणतात. नाचणीच्या भाकरीसोबत मिरचीचा ठेचा किंवा रिठा मधुमेही व्यक्तींसाठी फायदेशीर असल्‍याचे बोलले जाते.

ठाकरी मिरचीला पेटंट मिळायला हवे. तसेच चांगला हमीभाव मिळून हक्काची बाजारपेठ मिळाली पाहिजे. मिरचीचे हे गावठी वाण जतन करून आदिवासी व ठाकूर बांधवांना याबाबतची शास्त्रीय मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. तसेच इतर हंगामातही या मिरचीचे उत्पादन घेतले पाहिजे, जेणेकरून आदिवासी व ठाकूर समाजाला चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
- रमेश पवार, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

मिरचीची वैशिष्‍ट्ये
- साधारण फूट ते सव्वा फूट वाढणाऱ्‍या मिरचीच्या एका झाडाला दोनशे ते अडीचशे व एक ते सव्वा इंच लांबीच्या मिरच्या लागतात.
- सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पीक हाती येते. या मिरचीला ठाकरी मिरची, बुटकी मिरची व ठेंगू मिरची म्हणूनही ओळखले जाते.