पाटवाडी-मल्याण अंतर्गत रस्ता खड्ड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटवाडी-मल्याण अंतर्गत रस्ता खड्ड्यात
पाटवाडी-मल्याण अंतर्गत रस्ता खड्ड्यात

पाटवाडी-मल्याण अंतर्गत रस्ता खड्ड्यात

sakal_logo
By

अलिबाग, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील बेलोशी ग्रापंचायत हद्दीत येणाऱ्या पाटवाडी-मल्याण या दीड किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्याची अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथून प्रवास करणे नागरिकांना जिकिरीचे झाले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना, रेशन धान्य आणण्यास जाणाऱ्या पादचारी, चालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
मल्याण-पाटवाडी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठे गवत वाढलेले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. याच मार्गावरून शेतावरून जाणाऱ्यांसह बेलोशी गावाला हा रस्ता जोडल्याने मल्याण, आंबेपूर परिसरातील नागरिकांना तो सोयीस्कर वाटत आहे. मात्र, रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याच रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांची वर्दळही असते; परंतु येथून वाहन चालवणेही धोकादायक बनले आहे. मल्याण गावातील ग्रामस्थ सुशील पाटील यांनी याबाबत स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब अनेक वेळा आणून दिली आहे. मात्र, रस्ता दुरुस्तीबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. पाटवाडी-मल्याण हा अंतर्गत रस्ता बेलोशी, महाजने, सागवाडी अशा अनेक गावे, वाड्यांनाही जोडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती योग्य प्रकारे केल्यास प्रवासाचे अंतर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

----------------
पंधरा वर्षांपासून मल्याण-पाटवाडी हा रस्ता तयार करण्यात आला नाही. तो तयार व्हावा, अशी मागणी अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे केली; मात्र त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका दिसून येत नाही. त्याचा परिणाम मल्याणकडून बेलोशीकडे जाणाऱ्या प्रवाशांसह पादचारी व वाहनचालकांवर होत आहे. बेलोशी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. घोटवडे, मल्याण येथील नागरिकांची बेलोशीत रेशन धान्य आणण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांनाही याच खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा.
- सुशील पाटील, ग्रामस्थ, मल्याण
----------------------

मल्याण-पाटवाडी रस्ता खडगाळ झाला आहे. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकरी व अन्य प्रवासी, पादचाऱ्यांची वर्दळ कायम असते. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे. आंबेपूर फाटा ते बेलोशीपर्यंतचा रस्ता मंजूर झाला आहे. मल्याण गावातूनच हा रस्ता पाटवाडीकडून जाणार आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम तातडीने करावे.
- कृष्णा भोपी, सरपंच, बेलोशी