चक्रिवादळामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा भकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चक्रिवादळामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा भकास
चक्रिवादळामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा भकास

चक्रिवादळामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा भकास

sakal_logo
By

अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांची सध्या दुरवस्‍था झाली आहे. किनाऱ्यालगत बसवलेल्‍या लाद्या उखडल्‍या आहेत, आसन व्यवस्‍थेची मोडतोड झाली आहे. याशिवाय चेजिंगसाठी तयार केलेल्‍या कंटेनर रूमही गंजले आहे. त्‍यामुळे पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. निसर्ग चक्री वादळात झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्‍याने किनारा परिसर भकास वाटतो.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांच्या पसंतीत उतरतात. नारळी पोफळीच्या बागा, रूचकर पारंपरिक खाद्यसंस्‍कृती पर्यटकांना आकर्षित करतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्‍या श्रीवर्धनमध्येही पर्यटनाला चालना देण्यासाठी चार वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. कोट्‌यवधींचा खर्च करून याठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढला होता.मात्र निसर्ग चक्री वादळाने सुशोभित केलेल्‍या किनाऱ्याची दुरवस्‍था केली आहे. किनाऱ्यालगतच्या पायऱ्यांवर बसवलेल्‍या लाद्या तुटल्‍या आहेत. कपडे बदलण्यासाठी असलेल्‍या कंटेनर केबिनही गंजले आहे. पथ दिवे बंद असल्‍याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्‍य पसरत असल्‍याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.
समुद्रकिनारी पर्यटकांसह स्थानिकांसाठी केलेल्‍या आसनव्यवस्‍थेचीही मोडतोड झाली आहे. किनाऱ्याने विद्रूपीकरण झाल्‍याचे पर्यटकांची संख्याही कमी झाल्‍याचे स्‍थानिक व्यावसायिक सांगतात.
प्रामुख्याने पर्यटनावर आधारित व्यवसाय असल्‍याने श्रीवर्धनमधील लहान-मोठ्‌या व्यावसायिकांना किनाऱ्याच्या सुशोभीकरणाची प्रतीक्षा आहे. नुकतेच श्रीवर्धनमध्ये विकास कामांचे भूमीपूजन झाले. त्या वेळी श्रीवर्धनच्या विकासासाठी सुमारे तीस कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये श्रीवर्धन किनाऱ्याचे सुशोभीकरण प्रकल्पाचेही भूमीपूजन करण्यात आले. मात्र अद्यापही कामाला न झाल्‍याने स्‍थानिकांमध्ये नाराजी आहे.

निसर्ग चक्री वादळात किनाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. मंत्री असताना श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७ कोटी रुपये मंजूर केले आहे. कामाची निविदा काढण्यात आल्या असून कामही सुरू झाले आहे.

आदिती तटकरे
माजी पालकमंत्री