व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग मोकळा
व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग मोकळा

व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२८ ः महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जागेवर मिळावे यासाठी जात पडताळणी समितीने थेट महाविद्यालयांमार्फत जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मोहीम जिल्ह्यात सुरु केली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मागास वर्गातील विद्यार्थ्यांना एका दिवसात प्रमाणपत्र वितरीत केले जात असल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ७७ कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे या महाविद्यालयातील शंभर टक्के मागास विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळवण्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच दिलेल्या मुदतीत समितीकडे अर्ज सादर होत नसल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेता येत नसल्याने वेळप्रसंगी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत होती. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अकरावी - बारावी विज्ञान व अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या सर्व मागास वर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती प्रवर्ग, इतर मागास वर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रांसह आपल्या महाविद्यालयामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावयाचे आहे.
----------------------------------
समता दुतांमार्फत जनजागृती
या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून अकरा, बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी पदविका घेतलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमात निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये समता दुतांमार्फत जनजागृती सुरु केली जात आहे.
----------------------------------
दोन दिवसात १४१ विद्यार्थ्यांना वाटप
अलिबाग तालुक्यातील जेएसएम महाविद्यालयात ११६ व चोंढी येथील कनिष्ठ महाविद्यालयात २५ असे दोन दिवसात १४१ मागास विद्यार्थ्यांना एका दिवसात जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. विद्यार्थ्यांना जागेवर जात वैधता प्रमाणपत्र देण्याबरोबरच त्यांच्या मेलवरही ऑनलाइन प्रमाणपत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होत आहे.
-------------------------------
या मोहिमेच्या माध्यमातून महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ही मोहीम मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मागास विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे अर्ज सादर करावे.
-डॉ.भरत बास्टेवाड, अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, रायगड
------------------------------------------
जात वैधता प्रमाणपत्रावर दृष्टीक्षेप
एकूण महाविद्यालयांची संख्या - ७७
कनिष्ठ महाविद्यालयांची प्राप्त माहिती - ४५
एकूण प्राप्त विद्यार्थी संख्या - १,८७७
अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या - ५८६
वैधता प्रमाणपत्र वाटप संख्या - ५४३