कोर्लई किल्‍ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोर्लई किल्‍ला
कोर्लई किल्‍ला

कोर्लई किल्‍ला

sakal_logo
By

महेंद्र दुसार, अलिबाग
पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारताच्या किनारपट्टीवर १४९८ मध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले. व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या पोर्तुगीजांना येथे बस्तान मांडण्यासाठी पुढील वीस वर्षें संघर्ष करावा लागला. व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ. स. १५१० रोजी गोव्यात प्रवेश केला. गोवा ते वसईदरम्यान आपला एक तळ असावा, या शोधात असलेल्या पोर्तुगीजांना इ.स.१५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास कोर्लईचा किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पुढच्याच वर्षी पोर्तुगीजांनी कुंडलिका नदीच्या मुखाशी तीनही बाजूने पाण्याने वेढलेल्या भागात काम सुरू करत धक्का, तटबंदी आणि क्रूसाची बातेरी बांधली. यास यंदा ५०० वर्षे पूर्ण होत आहेत. ऊन-पाऊस आणि खाऱ्या वाऱ्याचा मारा झेलत कोर्लईचा किल्ला आजही कोकणच्या किनारपट्टीवरील सत्ता-संघर्षाचा इतिहास सांगत आहे.

चौल येथे पोर्तुगीजांची प्रमुख वसाहत होती. कोर्लईच्या किल्ल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या वखारीच्या संरक्षणासह सागर आणि कुंडलिका नदीच्या खाडी परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये, सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोर्लईवर ताबा मिळवला होता. मराठे, पोर्तुगीज, निजामशाही अशा तत्कालीन शासनकर्त्यांच्या ताब्यात राहिलेल्या या किल्ल्यावर चर्च, शंकराचे मंदिर आहे. नाताळ निमित्ताने किल्ल्यावर वर्दळ असते. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा प्रयत्न केला. १७३९ मध्ये चिमाजी आप्पांनी सुभानराव माणकराला कोर्लई किल्ला काबीज करण्यासाठी पाठवले. वर्षभर चाललेल्या संघर्षानंतर किल्ला मराठ्यांना जिंकता आला. त्यानंतर या किल्ल्याचा ताबा आंग्रे यांच्याकडे देण्यात आला. आंग्रे यांनी येथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला होता.
१८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. मात्र, येथील हिंदू-ख्रिश्चन संस्कृती कायम राहिली. किल्ल्यास एकूण ११ दरवाजे आहेत. मराठ्यांनी येथील ख्रिश्चन धर्मगुरूंच्या नावे असलेली बुरुजांची नावे बदलून सा. दियागोचे नाव पुस्ती बुरूज आणि सा. फ्रांसिस्कोचे नाव गणेश बुरूज ठेवले, आजही हे बुरूज सत्ता-संघर्षाची साक्ष देत भग्नावस्थेत उभे आहेत. पोर्तुगीज काळात बांधलेले नोसा सेन्योरा चर्च आता वापरात नसले तरीही त्याचे बांधकाम आणि वेदीची म्हणजेच आल्टरची जागा पर्यटकांना आजही नीट पाहता येते.

पोर्तुगीज-मराठीच्या मिश्रणातील नॉ-लिंग भाषा
कोर्लई परिसर शेकडो वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याने पोर्तुगीजसदृश्य भाषा आजही त्या गावात बोलली जाते, जिचे नाव नॉ-लिंग असे आहे. ‘नॉ लिंग’ चा अर्थ आमची भाषा असे असून ही भाषा बोलणारे फार थोडे कुटुंब येथे शिल्लक आहेत. या भाषेची लिपी ही देवनागरी असून नेहमीच्या वापरातील बरेचशे शब्द हे मूळचे पोर्तुगीज भाषेतील आहेत. १७३९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतरही ही भाषा नष्ट झाली नाही.

पोर्तुगीज भाषेतील शिलालेख
किल्ल्याच्या खंदकाच्या भिंतीवर पूर्वी एक ब्रॉन्झ धातूचा सिंह होता. खाली ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ असे लिहिले होते. माथ्यावर बालेकिल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरूड आहे. त्याच्याखाली ‘माझ्या तावडीतून माशांशिवाय कुणाचीच सुटका नाही’ असे लिहिले आहे. गडावर पाण्याची टाकीही आहे. बालेकिल्ल्यावर अनेक इमारती आहेत. विशेष म्हणजे किल्ल्याच्या एका बाजूस घनदाट जंगल आहे, तर दुसरी बाजू एकदम ओसाड आहे.