
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
अलिबाग, ता. ३ : थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स कंपनीने आयोजित केलेल्या रायगड पोलिस आरोग्य शिबिराचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय मोहिते यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३) करण्यात आले. थळ येथील आरसीएफचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर यांच्या उपस्थितीत अलिबाग येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात हे शिबिर पार पडले.
अलिबाग उपविभागातील अलिबाग, मांडवा सागरी, रेवदंडा आणि मुरूड ठाण्यातील ४० वर्षे वयावरील अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरसीएफतर्फे या शिबिराचे आयोजन केले आहे. सुमारे २०० स्त्री-पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टर्सकडून या शिबिरात करण्यात आली. यात रक्तदाब, रक्तशर्करा, बीएमआय, सीबीसी/एचबीए १सी, लिपिड प्रोफाईल आणि नेत्रचिकित्सा या तपासण्यांचा समावेश आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेत कृतज्ञता व्यक्त करावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरसीएफ थळतर्फे शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, आरसीएफचे मानव संपदा व प्रशासन मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, अतिरिक्त कार्यकारी उप विभागीय पोलिस अधिकारी जगदीश काकडे यांसह आरसीएफ व पोलिस अधिकारी उपस्थित होते.