
अलिबागमध्ये पार्किंग समस्या गंभीर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात कामानिमित्त येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. अरुंद रस्ते, पार्किंगसाठी कुठेही अधिकृत जागा नसल्याने बाहेरून येणाऱ्या चालकांना गाडी कुठे पार्क करायची, असा प्रश्न पडतो.
जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालयासमोर ही समस्या अधिक जाणवू लागली आहे. पोलिस मुख्यालय, न्यायालयाच्या समोर जप्त केलेल्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांना गाड्या उभ्या करण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागते.
सहा महिन्यांपूर्वी पार्किंगसंदर्भात नागरिकांच्या सूचना समजावून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी केलेल्या सूचनांची अद्याप अंमलबजावणी होताना दिसत नाही. रस्त्यावर जागा मिळेल तिथे वेड्यावाकड्या स्वरूपात वाहने उभी करण्यात येत असल्याने पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढते अशा वेळी चौपाटीवरील जागा कमी पडत असल्याने अनेकजण रस्त्यालगत गाड्या उभ्या करतात. समुद्राकडे जाणाऱ्या मार्गावरच वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होते. याचबरोबर जिल्हा रुग्णालय, अलिबाग एसटी थांबा, पीएनपी नगर येथील बेशिस्त पार्किंगमुळेही पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे.
बेशिस्त पार्किंगची ठिकाणे
एसटी बसस्थानक
दुचाकी - २५०
चारचाकी - ५०
जिल्हा परिषद
दुचाकी - १२५
चारचाकी -१००
जिल्हा न्यायालय
दुचाकी - ७०
चारचाकी- ८०
अलिबागमधील बहुतांश सोसायट्यांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. यामुळे रहिवाशांची वाहने रस्त्यावर उभी असतात. सुटीच्या दिवशी येणारे पर्यटक कशीही वाहने पार्क करतात. पर्यटक, शासकीय कामानिमित्ताने येणाऱ्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी अलिबागमध्ये जागा नाही. ही जागा उपलब्ध करावी.
- दिनकर म्हात्रे, नागरिक, अलिबाग
सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतर पार्किंगबाबतचे नियोजन वाहतूक शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. त्याचबरोबर दररोज वाहनचालकांवर कारवाई केली जाते; मात्र, बाहेरून येणारे नागरिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसते. शहरात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू असून सिग्नल यंत्रणा सुरळीत झाल्यानंतर त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
- शैलेंद्र सणस, पोलिस निरीक्षक, अलिबाग