अलिबाग-रोहा प्रवास जिकीरीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग-रोहा प्रवास जिकीरीचा
अलिबाग-रोहा प्रवास जिकीरीचा

अलिबाग-रोहा प्रवास जिकीरीचा

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) : अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. ठेकेदार नेमूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाशांकडून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
अलिबाग-रोहा या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता राज्य मार्ग म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र तरी रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. डागडुजी दरम्यान खडीचा वापर होत असल्याने सद्यस्थितीत रस्त्यावर खडीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे. आरसीएफ कॉलनी प्रवेशद्वारापासून ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्यही धोक्यात येऊ लागले आहे.
''बांधा, वापरा, हस्तांतरित करा''अंतर्गत अलिबाग-रोहा रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. अलिबाग-रोहापासून पुढे असलेल्या सुमारे ८६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १७७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. गुजरात येथील एका एजन्सीला या रस्त्याचे काम दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपये ठेकेदाराला प्लांट उभारण्यासाठी देऊन सहा महिने उलटून गेले, तरी कामाला सुरुवात झाली नाही. काम सुरू न झाल्याने प्रवाशांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवासीही खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. नेमलेल्या ठेकेदाराऐवजी आता सब ठेकेदार म्हणून आयस्कॉन कंपनीमार्फत रस्त्याचे काम केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आयस्कॉन या एजन्सीला सब ठेकेदार म्हणून काम देण्यात आले आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. सध्या सर्व्हेचे काम सुरू आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.
- जे. ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी रस्त्याचे काम तातडीने करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले आहे. नेमलेल्या एजन्सीऐवजी आयस्कॉन एजन्सीद्वारे रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दहा दिवसांत कामाला सुरुवात होईल. हा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी सूचना केल्या आहेत. नेमलेल्या एजन्सीला दोन टप्प्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाने १८ कोटी रुपये दिले आहे. मात्र, जॉईंड अकाऊंट असताना निधी काढला कसा? मागील सूत्रधार कोण असावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- महेंद्र दळवी, आमदार