
विद्यार्थ्यांमार्फत प्लास्टिकबंदी जनजागृती
अलिबाग, ता. १५ (बातमीदार) : प्लास्टिक पिशवीचा वापर करणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्याचा वापर प्रचंड होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीबाबत अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
अलिबाग तालुक्यातील मानीभुते या ठिकाणी कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जेएसएस रायगडच्या माध्यमातून जे. एस. एम. कॉलेजच्या वतीने प्लास्टिकबंदी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील व प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गावकऱ्यांना व एनएसएस स्वयंसेवकांना कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले. प्लास्टिकचा वापर केल्याने पर्यावरणावर त्याचा कसा परिणाम होतो. मानवी आरोग्य कशा पद्धतीने बिघडते, याची माहिती या वेळी देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड, प्रा. डॉ. मीनल पाटील, डॉ. सुनील आनंद आणि प्रा. श्वेता पाटील उपस्थित होते.