पर्यटन बहरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन बहरले
पर्यटन बहरले

पर्यटन बहरले

sakal_logo
By

पर्यटनाला बहर
नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

अमित गवळे, पाली
सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विलोभनीय निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण २४० किमीचा समुद्र किनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. सध्या नाताळच्या सुटीनिमित्त तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्‍ह्‌यातील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल आहेत. त्यामुळे व्यावसायिक व उद्योजक सुखावले आहेत. राहण्या-खाण्याचे दरातही गेल्‍या महिन्याच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, साहसी क्रीडा प्रकारांची चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली राज्य महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगलुरू महामार्गांवर गर्दी होत आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळते.
अलिबाग-नागाव, वरसोली, मुरूड-काशीद, श्रीवर्धन-दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. येथे विविध राईडचा आनंद घेत आहेत. माथेरानमध्येही पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. आठवड्याभरापासून येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी व्यावसायिक घेत आहेत.
अष्टविनायकांपैकी दोन गणपती रायगड जिल्‍ह्यात आहेत. खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर मंदिरात सध्या दररोज भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मुरूडमधील जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरणजवळील घारापुरी लेणी, महाड येथील गांधारपाले लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. स्‍थानिक नगरपालिका, नगरपरिषदा, व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटक करामुळे भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.
काही हॉटेल, रिसॉर्टमध्ये सवलती देण्यात आल्‍या आहेत तर काहींनी साइडसीन फ्री केले आहेत. मात्र अलिबाग, मुरूड, माथेरान आदी ठिकाणी बुकिंग फुल झाल्याने मिळेल तिथे जास्त पैसे देऊन पर्यटक निवास करीत आहेत.

नाताळ सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत खूप वाढ होत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत गर्दी कायम राहील. पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा योग्य दरात देण्यासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत. शिवाय स्‍थानिक प्रशासनाच्या महसुलातही वाढ होत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट आल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क वापरावे आवश्‍यक आहे.
- अमित खोत, सरपंच, हरिहरेश्वर

नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. अनेकांनी आगाऊ बुकिंग केले आहे. काही महिने मंदी होती मात्र आता खूप चांगला व्यवसाय होत आहे.
- मनीष पाटील, रिसॉर्टचालक, दिवेआगर

नाताळच्या सुट्टीत अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही गर्दी असेल. सध्या व्यवसाय बहरत आहे.
- अमित वरंडे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर

नाताळ सुट्ट्यांमध्ये रायगड किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांची गर्दी खूप वाढत आहेत. तसेच यंदा शाळांच्या सहलीसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे व्यवसायाला उभारी मिळाली आहे.
- अजित औकिरकर, व्यावसायिक, हिरकणी वाडी, रायगड किल्‍ला

कांदळवनाचा अभ्‍यास तसेच व निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण येत आहेत. येथील जैवविविधता व निसर्गाचा अमूल्य ठेवा जवळून अनुभवत आहेत. आलेल्या पर्यटकांना विविध प्रकारची माहिती व सेवासुविधा दिली जाते.
- सिद्धेश कोसबे, अध्यक्ष, दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटन गट

पाली ः समुद्रावर बोटिंगची मज्जा लुटतांना पर्यटक
पाली ः बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेले भाविक
पाली ः अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी
पाली ः दिवेआगर येथे कांदळवन पर्यटनाचा आस्वाद घेतांना पर्यटक