
दिवेआगर आठवडाभर राहणार हाऊसफुल
दिवेआगर आठवडाभर हाऊसफुल
अलिबाग, ता. २८ : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्णगणेश दर्शन व समुद्रकिनारी मौजमस्ती करण्याआठी पर्यटक रविवारपासूनच मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस हॉटेल, बीचवर गजबजाट राहणार आहे.
तालुक्यामध्ये दक्षिण काशी-हरिहरेश्वर, बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मस्थळ, श्रीवर्धन तसेच कोंडविल-आरावीचा समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून वर्षभर लाखोंची वर्दळ असते. येथील रूपनारायण, उत्तरेश्वर मंदिरही अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
समुद्रकिनारी घोडागाडी, उंट सफारी, घोड्यावर रपेट, वाळूवरील मोटारगाड्या, समुद्र नौकायन, साहसी खेळांचा पर्यटक भरपूर आनंद घेत आहेत. त्याचबरोबरच खेकडा, पापलेट, सुरमई, कोलंबी आदी माशांवर मनसोक्त ताव मारला जात आहे. शाकाहारी पर्यटकांसाठी परिसरामध्ये होणाऱ्या सेंद्रिय भाज्या व उकडीचे मोदक, सोलकढी आदी पदार्थांचा स्वाद खानावळी, हॉटेलमध्ये दरवळत आहे.
दिवेआगरमध्ये पर्यटन वाढीसाठी खूप चांगल्या संधी आहेत. या संधींचा शोध घेत नवनवे उपक्रम राबवले जात आहेत. आतापर्यंत जास्तीत जास्त पुण्यातील पर्यटक येथे येत असत, ही परिस्थिती बदलून देशातील विविध भागांतील पर्यटक येऊ लागले आहेत. गतवर्षी सुवर्ण गणेशमूर्तीची पुन्हा स्थापना करताना आम्ही काही ध्येयधोरणे आखली होती, ती आता सत्यात येत आहेत.
- अदिती तटकरे, आमदार, श्रीवर्धन